मूळ गावी जाण्यासाठी परराज्यातील मजुरांकरिता सोय

नाशिक : टाळेबंदी पुन्हा वाढल्यानंतर राज्य परिवहनतर्फे बाहेरगावी जाणाऱ्यांना तसेच परराज्यात जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना बसव्दारे सोडण्यात येत असून रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्य़ात दोन हजाराहून अधिक मजुरांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

राज्य परिवहनतर्फे परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांना राज्याच्या सीमे पर्यंत सोडण्यात येत आहे. राज्यातील रहिवासी असलेले मजूर आणि जे इतर राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या जिल्ह्य़ापर्यंत बसव्दारे पोहचविण्यात येत आहे. याशिवाय कोणत्याही इतर प्रवाशांसाठी बस सेवा मोफत नसल्याचे राज्य परिवहनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही सेवा सुरू होताच मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी रविवारी रात्री १२ वाजेपासून कसारा घाट परिसरातून इगतपुरी आगाराच्या सहकार्याने बस सोडण्यास सुरूवात झाली. रविवारी दिवसभरात ३० पेक्षा अधिक बस सोडण्यात आल्या. मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांची मोठी गर्दी असल्याची माहिती जिल्हा वाहतूक अधिकारी तसेच अन्य यंत्रणांना मिळताच त्यांना रस्त्यातच थांबवित त्यांची आवश्यक तपासणी करून बसमध्ये बसविण्यात आले. ही मंडळी आपल्या कुटूंब कबिल्यासह सोबत घेतलेल्या सायकलीही बसच्या टपावर टाकून निर्धास्त झाले.

बसने मोफत प्रवास होत असल्याने पायी जाणाऱ्या मजुरांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र सोमवारी कसारा घाट परिसरात पहावयास मिळाले. सोमवारी दुपारपासून मध्यप्रदेशच्या दिशेने बसच्या फेऱ्या सुरू झाल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत ठाणे येथे जाण्यासाठी ३६, तर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ६३ बस नाशिक विभागातून सोडण्यात आल्या. एका बसमधून केवळ २२ प्रवासी असे नियोजन असल्याने दोन हजार १७८ मजूर तसेच स्थलांतरितांनी या सेवेचा लाभ घेतला. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रवाश्यांसाठी अल्पोहार, शीतपेय याची व्यवस्था करण्यात आली.  बस सेवा सुरू झाल्याचे समजताच काही मंडळीनी बस स्थानक परिसरात गर्दी करण्यास सुरूवात केली. यासंदर्भाता विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी माहिती दिली. राज्य परिवहनतर्फे जिल्ह्य़ातील कोणत्याही स्थानकावरून किंवा अन्य तालुक्यात बस सेवा सुटणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्य़ातील बस स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन मैंद यांनी केले आहे.