आतापर्यंत ३० हजारांहून अधिक डाऊनलोड

सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धामधूम सुरू आहे. या उत्साहपूर्ण वातावरणाला किनार लाभली आहे ती विविध सामाजिक उपक्रमांची. उपक्रमांच्या भाऊगर्दीत समाज माध्यमांवरही बाप्पाने आपला ठसा उमटविला आहे. नाशिकच्या झाबुझा लॅब्झ या कंपनीने गणशोत्सवाचे औचित्य साधत बालगोपालांसह युवा वर्गासाठी खास ‘गणपती गेम’ तयार केला आहे. आतापर्यंत या गेमचे ३० हजाराहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत.
सध्याचे युग हे स्मार्टफोनचे युग म्हणून ओळखले जाते. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आल्याने संवादाचे ते वेगळेच माध्यम बनले. विविध सणोत्सव या माध्यमातून साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. हाच धागा पकडत झाबुझाने गणपती गेमची निर्मिती केली असून तो नि:शुल्क उपलब्ध आहे.
खेळाची निर्मिती करताना गणपतीचे आवडते खाद्य, वाहन, गणपतीची विविध रुपे या सगळ्यांचा कसा वापर करता येईल याचा सर्वांगीण विचार करण्यात आला आहे. यामध्ये गणपती मोदक मंच, गणपती रन, गणपती मोदक कॅचर, गणपती जिगसॉ पझल अशी खेळांची नावे आहेत. तसेच या खेळात गणपती अथर्वशीर्ष व गणपती आरती यांचाही समावेश करण्यात आला आहे. अथर्वशीर्षांचे उच्चार सातत्याने कानावर यावे यासाठी पाश्र्वसंगीतात अथर्वशीर्षांचा वापर करण्यात आला आहे. गणपती खेळासह गणपती लाईव्ह वॉलपेपरही खास गणेशोत्सवानिमित्त तयार करण्यात आले आहे.
याआधी झाबुझाने ‘बलून बो अ‍ॅण्ड अ‍ॅरो’, ‘दहीहंडी नॉक डाऊन’ हे खेळ तयार केले असून त्याला सर्वाधिक पसंती लाभली आहे. या सर्व खेळांना परदेशातील लोकांनी पसंती दिल्याचे झाबुझाचे संचालक मानस गाजर यांनी सांगितले. गणपती खेळ ‘अ‍ॅन्ड्राईड’ व ‘आयओएस’ वर देखील उपलब्ध असून हा खेळ उतरविण्यासाठी अ‍ॅन्ड्राईड वापरकर्त्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन गणपती मिनी गेम शोधावे. तसेच आयओएस वापरकर्त्यांने अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर्सवर जाऊन गणपती गेम शोधावे व तो डाऊनलोड करावा, असे त्यांनी सांगितले.