News Flash

नाशिक जिल्ह्य़ात दररोज ३५० पेक्षा अधिक करोनाचे नवीन रुग्ण

करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने मे महिन्यात जिल्ह्यात १२ दिवस कठोर टाळेबंदी लागू केली.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : सलग १२ दिवस कठोर टाळेबंदी आणि शिथीलीकरणात काही निर्बंध कायम ठेऊनही  जिल्ह्यात दररोज ३५० ते ४०० च्या दरम्यान नवीन रुग्ण आढळत आहेत. उपचाराधिन रुग्णांची संख्या देखील पाच हजारच्या जवळपास आहे. आता लसीकरणापूर्वी चाचणी केली जात आहे. दुसरीकडे करोनामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद करण्यातील कालापव्यय समोर आला आहे.

करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने मे महिन्यात जिल्ह्यात १२ दिवस कठोर टाळेबंदी लागू केली. निर्बंध उठविण्यात आले तेव्हां जिल्ह्यात प्रतिदिन ९५५

नवे रुग्ण आढळले होते. सकारात्मकतेची टक्केवारी ७.७४ टक्के होती. १६ हजार २२१ रुग्ण उपचार घेत होते. पुढील काळात निर्बंध अधिक शिथील झाले. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्रमाण अधिक आहे.

बाजार समिती, बाजारपेठांसह अन्यत्र होणारी गर्दी, नियमांकडे दुर्लक्ष यात फारसा फरक पडलेला नाही. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात नियमांच्या अमलबजावणीत यंत्रणांना मर्यादा येतात. जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या मते रुग्णसंख्या कमी होण्यास आणखी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो. मध्यंतरी १५ ते २० टक्क्यांवर गेलेली सकारात्मकतेची टक्केवारी आता साडेसहावर आली आहे. टाळेबंदीमुळे साखळी तोडण्यास मदत झाली असली तरी प्रतिदिन सरासरी साडेआठ ते १० चाचण्याचे प्रमाण कायम ठेवले गेल्याचे डॉ. पवार म्हणाले.

करोना काळातील मृत्यूंच्या आकडेवारीतील सावळागोंधळही उघड झाला. गुरूवारी एकाच दिवशी २७० मृत्यूंची नोंद केली गेली. यातील २६० मृत्यू हे मागील काळातील आहेत. खासगी, निमशासकीय रुग्णालयांवरील अतिरिक्त ताणामुळे माहिती पोर्टलवर भरली गेली नाही. संबंधितांना नोंदी अद्ययावत करण्यास अंतिम मुदत दिल्याने करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही वाढली आहे. यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर १.३१ टक्क्यांवरून १.३९ टक्के झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:03 am

Web Title: more than 350 corona new patients every day in nashik district zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 २९ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
2 करोना मृत्यूंच्या आकडेवारीत सावळागोंधळ
3 खोदलेले रस्ते दुकानदारांच्या मुळावर
Just Now!
X