धुळ्याला पाठविलेले नमुने आता पुणे प्रयोगशाळेकडे

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाचा एक रुग्ण असून ४० हून अधिक संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रयोगशाळेत नमुन्यांच्या तपासणीसाठी आवश्यक साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठविलेले नाशिकचे नमुने परत पाठविण्याची नामुष्की ओढावली. हे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

जिल्ह्य़ातील लासलगाव परिसरात करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने लासलगाव परिसरालगतची आठ गावे बंदिस्त केली. आरोग्य विभाग सव्‍‌र्हेक्षण आणि तपासणीत गुंतला. तसेच, करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ हून अधिक लोकांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णांलयामध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यांचे अहवाल प्रलंबित असतांना दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या परिषदेस नाशिक येथील ३२ जणांनी हजेरी लावल्याने त्यांचीही तातडीने तपासणी करण्यात आली. या सर्वाचा भार धुळे येथील शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेवर पडला. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेपर्यंत पोहचण्याचा वेळ, तपासणीसाठी लागणारे पाच ते सहा तास यात एका नमुन्यासाठी एक दिवस निघून जात असल्याने प्रलंबित अहवालांची संख्या ३९ च्या घरात आहे. धुळे प्रयोगशाळेने तपासणीसाठी पुरेसे साहित्य नसल्याचे नमूद करीत २९ नमुने नाशिक येथे पुन्हा पाठविले. तसेच १० नमुन्यांची तपासणी करून ते नकारात्मक असल्याचा अहवाल दिल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. धुळ्याच्या प्रयोगशाळेकडे पुरेसे साहित्य नसल्याने नाशिकचे नमुने परत पाठविले असून पुणे येथील आम्र्ड फोर्स वैद्यकीय महाविद्यालयात या नमुन्यांची तपासणी होईल, असे धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी सांगितले. सध्या सर्वत्र करोनाविरोधातील संरक्षक संचाचा तूटवडा भासत आहे. धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाने एक हजार संचाची मागणी केली आहे.

प्रयोगशाळेच्या क्षमतेनुसार साहित्य संच

धुळे येथील प्रयोगशाळेच्या क्षमतेनुसार करोना चाचणीसाठी तपासणी साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी उपलब्ध कुशल मनुष्यबळाचा विचार होणे गरजेचे आहे. राज्य स्तरावरून आलेल्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव, सटाणा तालुका तसेच धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथील संशयितांच्या थुंकीचे नमुने हे धुळे प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तर उर्वरित नाशिक जिल्ह्य़ातील नमुने हे पुणे येथील आम्र्ड फोर्स प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार २९ संशयितांचे नमुने त्या ठिकाणी पाठविण्यात आले असून सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत या संदर्भातील अहवाल प्राप्त होईल.

– डॉ. सुरेश जगदाळे (जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक )

नाशिकमध्ये खासगी प्रयोगशाळा ताब्यात घ्यावी

नाशिक जिल्ह्य़ातील करोना संशयितांच्या थुंकीचे अहवाल धुळे येथे पाठविण्यात येत होते. परंतु या प्रयोगशाळेत यंत्रणा अपुरी असल्याने हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवावे लागत आहेत. या प्रक्रियेस वेळ लागत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने खासगी प्रयोगशाळा चालकांना करोना तपासणीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे. वेळेत आजाराचे निदान व्हावे यासाठी नाशिक येथे खासगी प्रयोगशाळेसोबत जिल्हा प्रशासनाने सामंजस्य करार करावा अथवा प्रयोगशाळा ताब्यात घ्यावी.

– देवांग जानी  (सामाजिक कार्यकर्ते)