बांधावर खत देण्यात नाशिकची आघाडी

नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगाम अंतर्गत चार लाख नऊ हजार ३६ पुर्णाक ४३ हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष पेरणीखाली असून आतापर्यंत एकूण ७३.६३ टक्के पेरणी झाली आहे. यात भात, नागली आणि वरई या पिकांची पुनर्लागवड सुरू आहे. बाजरी, सोयाबीन आणि मका उगवण आणि वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.  तूर, मूग, उडिद, भुईमुग, कापूस वाढीच्या अवस्थेत आहे. तसेच खरीप कांदा हा जिल्हााच्या पूर्व भागात लागवडीखाली आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्य़ातील खरीप हंगामाची स्थिती मांडण्यात आली. जिल्ह्यात जून महिन्यात २३३.१० मिलीमीटर तर एक जुलै ते १३ जुलै या कालावधीत ७५.८० मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. प्रस्तावित क्षेत्रासाठी ९७ हजार ६९४ क्विंटल बियाणे मागणी पैकी प्रत्यक्ष पुरवठा ९७ हजार १०२ क्विंटल इतका झाला आहे.

रासायनिक खतांचे आवंटन २.११ लाख मेट्रीक टन आहे. यापैकी आजपर्यंत एक लाख नऊ हजार ५४३ मेट्रीक टन खत पुरवठा करण्यात आला आहे. शेंदरी बोंडअळी, मक्यावरील नवीन लष्करी अळी आणि किटकनाशके फवारणी याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या. जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकरी शेतीशाळा अंतर्गत ५२८ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले असून यात २५ टक्के महिलांनी सहभाग घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत जिल्ह्या १५ तालुक्यातील एक लाख ९८ हजार ५१२ शेतकरी सहभागी झाले होते. यातून एक लाख ८८ हजार ७७२ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे असल्याचे कृषी अधिकारी संजिव पडवळ यांनी सांगितले.

मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि मूग पीक किड रोखण्यासाठी प्रभावी उपायायोजना करुन, शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे तसेच ज्या ठिकाणी बियाणांच्या तक्रारी आल्या आहेत, तेथे तात्काळ नव्याने बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे भुसे यांनी सूचित केले. निफाड तालुक्यात काही ठिकाणी डाळिंब पिकावर तेलकट डाग दिसून येत आहेत. त्यावर उपाययोजना कराव्यात.

जिल्हा पातळीवर खत, बियाणे पुरवठादारांच्या परवाने नुतनीकरण रखडल्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे.

शेतकरी पीक विमा संदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा विमा ऐच्छीक स्वरूपाचा करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचे लाभ आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन घेता येतील. सर्व योजनांसाठी एकचअर्ज असल्याचे भुसे यांनी सांगितले.

राज्यात बांधावर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा अव्वल ठरला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर, बांधावर बियाणे आणि खत पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यात आजपर्यंत सात हजार ६१० गटांमार्फत ४८२१३. ५६ मेटिक टन खते आणि ३५५४८.९० क्विंटल बियाणांचा पुरवठा बांधावर करण्यात आला आहे. पिकांच्या गुणवत्ता नियंत्रणसाठी जिल्ह्यात ४४ गुण नियंत्रण निरिक्षक, प्रत्येक तालुक्यात एक आणि जिल्हास्तरीय एक अशी १६ भरारी पथके आणि जिल्हा स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापना करण्यात आले आहे.