09 July 2020

News Flash

‘१०८ रुग्णवाहिका’ रुग्णांसाठी आधार

राज्यात एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची वाहतूक

राज्यात एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची वाहतूक

चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर, मार्च अखेरपासून देशासह राज्यात लागू झालेल्या टाळेबंदीत वाहतुकीवर निर्बंध आले. या काळात खासगी, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहिली. अशावेळी करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असतांना आरोग्य विभागाची ‘१०८ रुग्णवाहिका’ करोनाबाधितांसह अन्य आजारांच्या रुग्णांची खऱ्या अर्थाने आधार बनली. राज्यात एक लाख, नऊ हजार, ६७ रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका धावली. अपघातग्रस्तांच्या मदतीला १०८ धावून आली. तसेच करोनाबाधित रुग्ण, गरोदर माता, अन्य आजाराच्या गंभीर रुग्णांसाठी ती जीवनदायिनी ठरली.

राज्यात करोनाग्रस्तांचा आलेख उंचावत असतांना सरकारी, खासगी रुग्णालये करोना बाधितांसाठी अधिग्रहित झाली. या ठिकाणी मधुमेह, डायलिसीस किंवा अन्य आजारांच्या रुग्णांसह ग्रामीण भागातून येणाऱ्या गरोदर मातांपुढेही त्यामुळे समस्या निर्माण झाली. करोनाग्रस्त नसलेल्या रुग्णांसाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस-१०८) रुग्णवाहिका संजीवनी ठरली. रुग्णांना घरापासून सरकारी रुग्णालयापर्यंत नेण्याचे महत्वपूर्ण काम १०८ रुग्णवाहिका सेवेने केले. टाळेबंदीत पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाकडून वाहतुकीची परवानगी मिळवत डॉक्टरांचा दवाखाना गाठणे अनेकांसाठी जिकीरीचे ठरत होते. तरीही १०८ च्या रुग्णवाहिकेने रुग्णसेवेचे काम अविरतपणे सुरू ठेवले.

राज्याचा विचार केल्यास मुंबईमध्ये २१ हजार ९३, ठाणे दोन हजार ८०१, सिंधुदुर्ग तीन हजार १९७, नागपूर १३०३, पुणे सहा हजार २९३, कोल्हापूर सहा हजार १०३ रुग्णांसाठी रुग्णवाहिका धावली. विशेष म्हणजे दुर्गम, आदिवासीबहुल असलेल्या गोंदिया येथे १५४७, गडचिरोली ५९५, पालघर येथे ५३९ जणांनी रुग्णवाहिकेचा लाभ घेतला.

नाशिक जिल्ह्य़ात सहा हजार ९७२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.  जिल्ह्य़ात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधील ४६२, मारामारीतील  ११६ जखमी, स्वतला जाळून घेतलेले किंवा दुसऱ्याकडून जळालेले १९, हृदयविकाराशी संबंधित तक्रारी असणारे आठ, उंचावरून पडलेले, घरात पाय घसरून पडलेले १०८, गरोदरपणातील अत्यावश्यक तपासण्यांसाठी एक हजार ८१४ गर्भवती महिला, विषबाधीत १९२ तसेच अंगावर वीज कोसळल्याने तसेच विजेचा धक्का बसल्याने तीन, मोठय़ा प्रमाणावर रुग्ण एकाचवेळी समोर आलेले ११, आपत्कालीन वैद्यकीय सेवेत तीन हजार ८२२ (करोनाग्रस्त रुग्ण), आत्महत्येचा प्रयत्न किंवा आत्महत्या सहा आणि इतर ४११ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती रुग्णवाहिकेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली.

गरोदरांसाठी मदतीचा हात

गरोदरपणातील नऊ महिन्याच्या कालावधीत नियमित तपासण्यांव्यतिरिक्त अचानक होणारा त्रास पाहता महिलांसाठी १०८ रुग्णवाहिका संजीवनी ठरली. दैनंदिन व्यवहार ठप्प असतांना आवश्यक औषधे मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली.  अशा स्थितीत १०८ रुग्णवाहिकेला दूरध्वनीवरून माहिती दिली असता संबंधित महिलेस गावातून तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्य़ाच्या ठिकाणी नेण्यात येऊन प्राथमिक उपचार दिले गेले. काही महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. या सेवेमुळे माता-बाल मृत्यू रोखण्यास मदत झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 3:05 am

Web Title: more than one lakh patients in maharashtra use 108 ambulance service zws 70
Next Stories
1 सेना-भाजप नगरसेवकांकडून पोलिसाला मारहाण
2 करोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती आता एका अ‍ॅपवर
3 करोना रुग्णांसाठी अतिरिक्त खाटांची व्यवस्था करा
Just Now!
X