प्रवेश प्रक्रियेला शुक्रवापर्यंत मुदतवाढ

नाशिक : आर्थिक दुर्बल आणि सामाजिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) वंचित घटकांना नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात तिसऱ्यांदा प्रवेशासाठी शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली असून १० मेपर्यंत पहिल्या फेरीतील पालकांनी पाल्यांचे प्रवेश घ्यावेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

दारिद्रय़ रेषेखालील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया खुली करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या माध्यमातील ४५७ शाळांमध्ये पाच हजार ७३५ जागांवर पहिल्या टप्पात पूर्वप्राथमिक, प्राथमिकच्या पहिल्या वर्गासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. यामध्ये जिल्हा परिसरातील वेगवेगळ्या माध्यमांसाठी ऑनलाइन पद्धतीने १४,९९५ पालकांनी अर्ज भरले. पुणे येथे सोमवारी पहिली सोडत काढण्यात आली.

एक किलोमीटर आतील निकषानुसार पूर्वप्राथमिकच्या ७४ तसेच प्राथमिकचे तीन हजार ४४४ विद्यार्थी यानुसार एकूण तीन हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी याआधी २६ एप्रिल ही अंतिम मुदत असताना कागदपत्रांची पूर्तता आणि अन्य कारणांमुळे संचालनालयाने ४ मेपर्यंत मुदत वाढवून दिली. पालकांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे आता १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवापर्यंत ऑनलाइन पद्धतीने तीन हजार ५१७ पैकी दोन हजार ४०८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्याप एक हजार १०९ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.

मुदतवाढीमुळे प्रवेश प्रक्रिया खोळंबली

शिक्षण विभागाकडून सलग तिसऱ्यांदा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी यामुळे पुढील टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया खोळंबली आहे. पहिल्या यादीतील एक हजाराहून पात्र विद्यार्थ्यांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील पात्र ठरणारे विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. बहुतांश शाळांमध्ये पूर्वप्राथमिक- प्राथमिकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याने ‘प्रवेश पूर्ण’ची पाटी शाळांबाहेर लटकत आहे. शिक्षण विभागाकडून वरिष्ठ स्तरावरून वारंवार देण्यात येणाऱ्या मुदतवाढीने अन्य पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. शिक्षण विभागाने तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.