धर्मगुरू, लोकप्रतिनिधी यांच्यासह लोककलांचा आधार घेऊन प्रबोधन 

माता-बालमृत्यूवर नियंत्रण मिळविण्यात लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असताना आरोग्य विभागाला आजही लसीकरणासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ‘मिशन इंद्रधनुष्य’चे बिगूल वाजवले जात असताना मालेगाव शहर परिसरात मात्र लसीकरणाचे सत्र यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासनाला वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. लसीकरणाविषयी सजगता निर्माण व्हावी, यासाठी धर्मगुरू, लोकप्रतिनिधी यांच्यासह लोककलांचा आधार घेत प्रबोधनाचे काम मालेगाव शहर परिसरात सुरू झाले आहे. याचा प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी कसा प्रतिसाद लाभतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

माता-बालमृत्यूची आकडेवारी पाहता आरोग्य विभागाकडून नियंत्रणासाठी प्रयत्न होत आहेत. वेगवेगळ्या योजनांचा भडिमार होत असताना आजार होऊच नये यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरते. रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेली नवजात बालके, गरोदर माता यामध्ये कुठलाही आजार बळावण्याची शक्यता सर्वाधिक असते. या पाश्र्वभूमीवर ‘मिशन इंद्रधनुष्य’ची आखणी करत सुक्ष्म कृती आराखडा आरोग्य विभागाने तयार केला आहे. यामध्ये कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न होत आहे.

मालेगावमध्ये चित्र काहीसे वेगळे आहे. मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या या शहरात आजही बालकाला लसीकरण का करायचे, लसीकरण महत्त्वाचे आहे का, बाळाला काही झाले तर, आमचा धर्म आम्हाला यासाठी परवानगी देत नाही, असे वेगवेगळे प्रश्न आणि कारणे ऐकून आरोग्य विभागाच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. लसीकरण वेळीच न झाल्याने बालकांमध्ये क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, कावीळ, पोलिओ आदी आजार बळावण्याची शक्यता सर्वाधिक आहे. काही वस्ती परिसरात अशी आजारी बालके समोर येत असताना गरोदर मातांनाही लसीकरण होत नसल्याने येणाऱ्या बाळाच्या जिवाला जंतुसंसर्ग, साथीचे आजार याचा त्रास होऊ शकतो. २०१७ मधील पूर्वानुभव पाहता यंदा आरोग्य विभागाने मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पुढील तीन महिने या कालावधीत शून्य ते दोन वर्षे वयोगटातील ११ हजार ४००, तर दोन हजार १७ गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.

मोहिमेत १०० टक्के लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात येत आहे. महापौर, नगरसेवक, आमदार यांच्यासोबत बैठका सुरू आहेत. याशिवाय धर्मगुरूंना सोबत घेत लसीकरणाचे महत्त्व प्रार्थनेच्या वेळी किंवा सामूहिक बैठकीत पटवून देण्यात येत आहे. कुठल्या वयोगटात कोणती लस याविषयीची प्रसिद्धी पत्रकेही उर्दू भाषेत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच निरक्षर नागरिकांसाठी, वस्ती पातळीवर ही माहिती पोहोचावी यासाठी दोन वाहने खरेदी करण्यात आली आहेत.

या फिरत्या वाहनातून बालक-माता यांना लसीकरण का महत्त्वाचे याविषयी लघुपट, चित्रफितीच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. तसेच पथनाटय़, लोककलांमधूनही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याची माहिती मोहीम समन्वयक डॉ. बी. के. त्रिभुवन यांनी दिली.