टाकीची भिंत कोसळून आईचा मृत्यू, वडिल गंभीर जखमी

नाशिक : सकाळी शाळेत निघायचे म्हणून तयारी करणारी माजमा असो की, झोपेतून नुकतीच उठलेली तिची तीन भावंडे असोत. घरासमोरील टाकीची भिंत कोसळून नेमके काय झाले? हे त्यांना कळलेच नाही. गर्दी, गोंधळात भांबावलेली त्यांची नजर आपल्या आईला शोधत होती. पण, त्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने ती कधीच परतणार नाही, हे लहानग्यांना सांगण्याची हिंमत आप्तही करू शकले नाहीत.

मूळचे पश्चिम बंगाल येथील शेख कुटुंबीय. रोजगारासाठी शहरात आले. मझहर आलम शेख आणि बेबी सहनबी खातून  हे दोघे धुव्रनगर येथील सम्राट ग्रुपच्या गृह प्रकल्पावर काम करायचे. आवारात कच्च्या स्वरुपात उभारलेल्या घरात कुटुंबाचे वास्तव्य होते. माजमा, समाईत, सहरेम आणि सराफत ही त्यांची चार मुले. सर्वाचे वय दोन ते सात वर्षांदरम्यान. दुर्घटनेत त्यांना आई गमवावी लागली.

माजमा महापालिका शाळेत शिक्षण घेते. आईने सकाळी तिच्यासाठी डबा तयार केला होता. गणवेश परिधान करून ती काही खाऊन घरातून निघणार होती. इतर भावंडे झोपेतून उठत होते. आई खातून शेख घरासमोरील टाकीवर कपडे धुण्यासाठी गेली. त्याचवेळी भिंत कोसळली. मुलांचे वडीलही तिथेच आंघोळ करत होते. ते देखील ढिगाऱ्याखाली सापडले.

परिसरात एकच गोंधळ उडाला. लहानग्यांना तो काही उमगला नाही. आसपासच्या मजुरांनी धाव घेतली. काही वेळात अग्निशमन दलासह पोलीसही घटनास्थळी आले. आई, वडील दिसत नसल्याने माजमा शाळेसाठी तयार होऊनही गेली नाही. बाहेरच्या गोंधळाने ती भांबावली. तिच्यासह भावंडे आईची प्रतीक्षा करत होते. शेजारी राहणारे नातेवाईक चिमुरडय़ांजवळ थांबले. त्यांनी भावंडांना काही खाण्यास दिले. बराच वेळेपासून आई, वडील दिसत नसल्याने काही भावंडे त्यांच्याबद्दल विचारणा करू लागले. त्यांना काय उत्तर द्यायचे, हा प्रश्न नातेवाईकांना पडला होता.

दुर्घटनेत चिमुरडय़ांची आई मृत्युमुखी पडली तर वडील गंभीर जखमी झाले. आपल्या गावापासून हजारो किलोमीटरवर आलेल्या लहानग्यांना तूर्तास शेजारील नातेवाईकांशिवाय कोणाचा आसरा नाही.

घटनास्थळी आसपासच्या नागरिकांसह पोलीस, पालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी भेट देत होते. पण, गर्दीत चिमुरडे एकाकी पडल्याचे चित्र होते.