पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याचा संस्कार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्य़ात दुष्काळसदृश परिस्थिती असताना प्रशासनाच्या पातळीवर टँकर, विहीर पुनर्भरण आदी माध्यमांतून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांवर जल साक्षरतेचे संस्कार करण्यासाठी शासनाच्या पर्यावरण सेवा योजनेच्या वतीने सटाणा तालुक्यातील टेंभे  येथील जनता विद्यालयात ‘भूजल पुनर्भरण’ अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सध्या जल साक्षरतेचे धडे गिरवीत असून विद्यार्थी ‘पाण्याचे अंदाजपत्रक’ तयार करणार आहेत.

जनता विद्यालयात जल साक्षरतेवर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना जलदूत बनवून घरातील मोठय़ांकडून पाणी वापरात होणाऱ्या चुकांना प्रतिबंध करण्याविषयी प्रबोधन करण्यात येत असून त्यांना कृतिप्रवण करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. या अंतर्गत छतावरील पावसाचे पाणी जमिनीत जिरविणे या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी गावातील १० घरांच्या छताचे क्षेत्रफळ मोजले. छताचे क्षेत्रफळ मोजून त्यामध्ये किती लाख लिटर पावसाचे पाणी संकलन होईल, याबाबत गणितीय आकडेमोड करून उत्तर काढण्यात आले. पुढच्या टप्प्यात छतावरील पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविण्यासाठी घरापासून पाच फूट अंतरावर शोषखड्डा तयार करण्यात येणार आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या ५० गळक्या नळांचे परीक्षण करून ३६ नळांच्या तोटय़ा बदलण्यात आल्या. तसेच ज्या नळांना तोटय़ा नव्हत्या, त्यांना नवीन तोटय़ा बसविण्यात आल्या. यामुळे पाणी बचत होणार आहे. विद्यार्थ्यांनी गावात सर्वेक्षण करीत गटारीचे वाहणारे सांडपाणी हे जमिनीत जिरवण्यासाठी चार ठिकाणी शोषखड्डे तयार करण्यात येत आहे. हे शोषखड्डे नियोजन नकाशात दर्शविण्यात येणार असून यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन जलजन्य आजार तसेच पाणी शुद्धीकरण प्रक्रिया याची माहिती घेतली. प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद विकसित होण्यास मदत झाली. भविष्यात भूजल पुनर्भरण, बोअरवेल पुनर्भरण, लोकसहभागातून समतल चर, शोषखड्डा, बंधारे असे गावाचे ‘पाण्याचे अंदाजपत्रक’ तयार करून कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

भविष्यात पाणीबचत

विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे नळाच्या तोटय़ा बदलण्यात आल्या. ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाण्यापासून बचत झाली आहे. सोबतच जलपुनर्भरण, शोषखड्डे याबाबत नियोजन सुरू आहे. ज्या माध्यमातून सर्व घटकांसाठी पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध होऊ शकेल यासाठी प्रयत्न होत आहे.

– जगदीश ठाकूर (प्रकल्पाधिकारी, पर्यावरण सेवा योजना, नाशिक विभाग)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Move to the village of tembe water literacy and rehabilitation of ground water
First published on: 13-02-2019 at 01:17 IST