केंद्र सरकारची निष्क्रियता तसेच इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘दुचाकी ढकलो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन दिले.

निवेदनात आंदोलनामागील भूमिका मांडण्यात आली आहे. देशात महागाई वाढली असून केंद्र सरकारच्या शून्य नियोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ढासळत असून देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्नाने निच्चांक पातळी गाठली आहे. इंधन दरवाढ सातत्याने होत असून सर्वसामान्यांना परवडणारी नाही. टाळेबंदीच्या काळातही इंधन दरवाढ सुरू असून दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालविला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनेकांचा रोजगार गेला असून कडधान्य, भाजीपाला, डाळी यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. खाद्य तेलांच्या किमती वाढत असून गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या महागाईचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी बंद असलेल्या दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणल्या. केंद्र सरकार विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे, सचिन पिंगळे आदी उपस्थित होते.