करोनाचा वाढता प्रादुर्भाव, रेमडेसिविरचा तुटवडा, प्राणवायू, खाटांची कमतरता या त्रुटींमळे रुग्णांची होणारी हेळसांड आणि त्यामुळे रुग्ण दगावण्याचे वाढलेले परिणाम बघता मनमाड येथे करोना केंद्र होणे गरजेचे असताना प्रशासन मात्र अशा परिस्थितीत देखील गंभीर नसल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून नांदगाव तहसील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांनी आंदोलन केले. दुसरीकडे, मनमाड  केंद्रासाठी ३० खाटा तसेच पाणी, प्राणवायू वाहिनी आणि ३९ कर्मचारी मिळाले असून प्राणवायू सिलिंडर येताच हे केंद्र तातडीने सुरू होणे अपेक्षित असल्याचे राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष बबलुभाऊ पाटील यांनी म्हटले आहे.

मनमाडमध्ये करोना केंद्र उभारणार अशी मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी देखील मनमाड शहरात येऊन करोना परिस्थितीचा आढावा घेत तातडीने करोना केंद्र उभारण्यात यावे, असे आदेश दिले होते. तसेच आमदार सुहास कांदे यांनीदेखील करोना केंद्र उभारण्याबाबत आढावा बैठकीत सूचना केल्या होत्या.आरोग्य विभागाकडून तशा हालचालीही सुरू झाल्या. परंतु, अतिशय संथपणे ही प्रक्रि या होत आहे. मध्यंतरी नांदगाव तालुक्यातील करोना संसर्गाने मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढत असताना आतापर्यंत मनमाडमध्ये करोना केंद्र सुरू होणे गरजेचे होते. असे असतानाही अजूनही केंद्र सुरू न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांत केंद्र सुरू न झाल्यास मुखपट्टी न लावता करोना केंद्रात  जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा गुप्ता यांनी प्रशासनास दिला आहे.

करोना केंद्रासाठी कर्मचारी उपलब्ध

मनमाड रेल्वे रुग्णालयात होणाऱ्या ३० खाटांच्या अद्ययावत करोना केंद्राला लागणारे डॉक्टर आणि परिचारिका असे ८० टक्के  कर्मचारी उपलब्ध झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बबलुभाऊ पाटील यांनी दिली. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पालकमंत्री छगन भुजबळ यांना येवला येथे सोमवारी भेटले. पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने मनमाडचे करोना केंद्र सुरू होत नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. या मागणीची भुजबळ यांनी तात्काळ दखल घेतली. येवला येथे आढावा बैठकीस उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, वैद्यकीय अधीक्षक अशोक थोरात, खैरे यांना मनमाड  केंद्रासाठी लागणारे कर्मचारी व यंत्रणा तातडीने उभी करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने सूत्रे हालली. केंद्रासाठी लागणारे ८० टक्के कर्मचारी तातडीने उपलब्ध झाले असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरवणे यांनी बबलुभाऊ पाटील यांना सांगितले. भुजबळ यांना येवला येथे माजी नगराध्यक्ष बबलुभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अमजद पठाण, सेवा दल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, रईस फारूकी, प्रकाश बोधक, अरविंद काळे आदींचे शिष्टमंडळ भेटले होते.