शहरातील गंजमाळ परिसरातील आगीत नुकसान झालेल्यांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबास एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी बी. डी. भालेकर मैदानावर आंदोलन करण्यात आले.

गंजमाळच्या भीमवाडी झोपडपट्टीला २४ एप्रिल रोजी लागलेल्या आगीत ११६ झोपडय़ांचे नुकसान झाले. अद्याप त्यांना प्रशासकीय मदत मिळालेली नाही. ११६ कुटुंबातील ६०० जण त्यांचे घर पूर्ण जळाल्याने महापालिकेच्या शाळेत निर्वासितांचे जीवन जगत आहे.

महापालिकेच्या शाळेतील एका खोलीत १५ व्यक्ती राहत असून शारीरिक अंतर नियमाचा फज्जा उडाला आहे. या कुटुंबांना तत्काळ मदत होणे अपेक्षित असतांना शासन याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला.

झोपडपट्टीतील कलाबाई साळवे, सरूबाई मुंडे, ज्ञामाबाई हिरोडे यांचा मृत्यू झाला. तरीही शासनाने मदत दिलेली नाही. झोपडी, घर नुकसान भरपाई अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात यावी, अशी मागणी आ. फरांदे यांनी केली.