29 May 2020

News Flash

महापौरपदाच्या फसलेल्या प्रयोगावर अळीमिळी गुपचिळी!

संजय राऊत यांच्यासमोर विषय मांडण्यास पदाधिकारी अनुत्सुक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाशिक येथे स्वागत करताना पदाधिकारी.

संजय राऊत यांच्यासमोर विषय मांडण्यास पदाधिकारी अनुत्सुक

नाशिक : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शहरात प्रथमच आलेले खासदार संजय राऊत यांचे सोमवारी शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषात स्वागत केले. पुष्पगुच्छांसह शुभेच्छांचा वर्षांव झाला. राऊत यांच्या अभिनंदनासाठी मित्रपक्षाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले. राज्यात सेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्याचा आनंद सर्वाच्या चेहऱ्यावर झळकत होता. या जल्लोषात नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग का फसला? सेनेवर माघार घेण्याची नामुष्की का ओढवली? हा विषय मात्र अनुत्तरित राहिला. शिवसैनिक आणि राऊत यांच्या भेटीगाठीत या विषयावर चर्चाच झाली नाही

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यात राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविताना विरोधी भाजपला धारेवर धरण्यात ते आघाडीवर होते. महिनाभराच्या विलक्षण घडामोडींनंतर सेनेने भाजपला कात्रजचा घाट दाखवला. या पार्श्वभूमीवर, सोमवारी नाशिक येथे आलेल्या राऊत यांचे शिवसैनिकांनी उत्साहात स्वागत केले. फटाके फोडण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते उपस्थित होते.

राज्यात सत्ता स्थापन झाल्यामुळे शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. बहुतेकांनी पुष्पगुच्छ देत राऊत यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे यांनी विश्रामगृहात येऊन त्यांची आवर्जून भेट घेतली. शुभेच्छा दिल्या.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे समीकरण सत्तास्थानी आले असले तरी नाशिकच्या महापौर निवडणुकीत मात्र तो प्रयोग फसला होता. राऊत यांच्या भेटीप्रसंगी याबाबत चर्चा होईल, अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती. परंतु तसे घडले नाही. भाजप, राष्ट्रवादी आणि सेना असा प्रवास करणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी राऊत यांची भेट घेतली. परंतु गर्दी असल्याने महापौर निवडणुकीबाबत चर्चा झाली नसल्याचे सानप म्हणाले. महानगरप्रमुख मराठे, बडवे यांनीही तशी चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

पालिकेतील सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच म्हणणे होते. महापौर निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे समीकरण का जुळले नाही, याबद्दल राऊत यांच्याकडे लघुसंदेशाद्वारे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्रिपद सेनेला मिळाल्याचा आनंद इतका मोठा होता की, भेटीगाठी, अभिनंदन, शुभेच्छांच्या वर्षांवात महापौर निवडणुकीचा विषय मागे पडला.

नाशिकच्या फसलेल्या प्रयोगावर मौन

राज्यात अस्तित्वात आलेला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा प्रयोग फोडाफोडीचे प्रयत्न करूनही महापालिकेत प्रत्यक्षात आला नाही. काँग्रेसच्या संदिग्ध भूमिकेमुळे महाआघाडीत फूट पडली. समीकरण बिघडल्याने भाजपचे फुटीर नगरसेवक स्वगृही परतले. मनसेने भाजपला सहकार्य केल्याने भाजपने महापालिकेवरील सत्ता राखण्यात यश मिळवले. राज्यातील बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन शिवसेनेने स्पष्ट बहुमतात असणाऱ्या भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पुढाकार घेतला होता. शिवसेनेत आलेले माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक भाजपच्या १० नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले होते. हे नगरसेवक सेनेला जाऊन मिळाले होते. त्यांच्यासह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्षांच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचे शिवसेनेचे मनसुबे भाजपने उधळून लावले. समीकरण बिघडल्याने भाजपचे नगरसेवक स्वगृही परतले. या विषयावर मात्र सर्वानी मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:49 am

Web Title: mp sanjay raut meet shiv sena party workers in nashik zws 70
Next Stories
1 इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडीकडे जाण्यासाठी रस्ताही नाही
2 कांद्याची १० हजारी उसळी
3 छगन भुजबळ यांच्या राजकारणाला ऊर्जितावस्था
Just Now!
X