वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम

जिल्ह्यतील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक वर्गवारीच्या आठ लाख १२ हजार ग्राहकांकडे सद्य:स्थितीत तब्बल ११ कोटी ६२ लाख रुपये थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे ही थकबाकी आहे. मालेगाव मंडळांतर्गत येणाऱ्या कळवण विभागात २० हजार ५३७ ग्राहकांकडे एक कोटी ८६ लाख, मालेगाव शहर विभागात एक लाख ८ हजार ३०४ ग्राहकांकडे २५ कोटी आठ लाख, मनमाड विभागात ५३ हजार ३८६ ग्राहकांकडे पाच कोटी ९२ लाख, सटाणा विभागात २७ हजार ८७८ ग्राहकांकडे दोन कोटी ५७ लाख अशी मालेगाव मंडळात दोन लाख १० हजार १०५ ग्राहकांकडे ३५ कोटींहून अधिकची थकबाकी आहे. नाशिक मंडळातील चांदवड विभागात ६४ हजार ३३० ग्राहकांकडे साडेसहा कोटी, नाशिक ग्रामीणमध्ये एक लाख ३० हजार १०५ ग्राहकांकडे १५ कोटी २४ लाख, नाशिक शहर एक विभागात एक लाख ४७ हजार ४८९ ग्राहकांकडे २४ कोटी, नाशिक शहर दोन विभागांत दोन लाख ६० हजार १३० ग्राहकांकडे ३० कोटी ४९ लाख अशी नाशिक मंडळात एकूण सहा लाख दोन हजार ५४ ग्राहकांकडे ७६ कोटी १९ लाख रुपये थकबाकी आहे.

देयकांचा भरणा न केल्यास नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत भ्रमणध्वनी किंवा ईमेलवर नोटीस पाठविली जाते. कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जातो. कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे

वीज देयकांविषयीची सुविधा

वीज देयक नियमितपणे मुदतीत मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वारंवार केल्या जातात.ग्राहकाने संबंधित उपविभागीय कार्यालयात वा शहरी भागात मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र येथे ग्राहक क्रमांक दिल्यानंतर तात्काळ वीज देयकाची दुसरी प्रत त्यांना तात्काळ मिळेल. तसेच महावितरणचे संकेतस्थळ आणि महावितरणच्या भ्रमणध्वनी अ‍ॅपवर घरबसल्या दरमहा देयके पाहण्यासोबतच देयकाचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा दिल्या आहेत. ग्राहकांना भ्रमणध्वनीवर वीज देयक तयार झाल्यावर लगेचच संदेश दिला जातो. हा संदेश दाखवून ग्राहक कुठल्याही वीज भरणा केंद्रात देयक भरणा करू शकतात. कुठल्याही माहिती, तक्रारीसाठी  संपर्क क्रमांक- १९१२, १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५