महावितरणच्या संकलन केंद्रांची तापदायक कार्यपद्धती
महावितरण कंपनीच्या संकलन केंद्रांनी वीज देयकांची रक्कम धनादेशाच्या माध्यमातून स्वीकारण्यास हात आखडता घेतल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. धनादेशाच्या स्वरूपात प्राप्त होणाऱ्या रकमेचा हिशेब ठेवणे अवघड ठरत असल्याने कंपनीने ही शक्कल लढविली, परंतु ग्राहकांचे धनादेश स्वीकारू नये अशी स्पष्ट सूचना करणे अवघड असल्याने कंपनीने धनादेशाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर त्या देयकांची ग्राहकांना पावती द्यावी, असे सूचित केले. मुख्यालयाच्या या निर्देशामुळे शहरातील बहुतांश केंद्रांनी धनादेश स्वीकारण्यास थेट नकारघंटा देणे सुरू केले आहे. त्याचा फटका धनादेशाद्वारे नियमितपणे देयके भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना बसला आहे. कंपनीच्या सूचनेनुसार कुठे धनादेश स्वीकारला गेला तरी ग्राहकाला एकदा धनादेश देण्यासाठी आणि तो वटल्यानंतर पावती घेण्याकरिता हेलपाटे मारावे लागणार आहेत.
महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविल्या जाणाऱ्या देयकांची रक्कम स्वीकारण्यासाठी नाशिक शहर व परिसरात १०४ केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांमार्फत आजवर रोख रक्कम आणि धनादेश या स्वरूपात देयके स्वीकारली जात होती, परंतु डिसेंबरच्या सुरुवातीपासून या केंद्रांच्या कार्यपद्धतीत अचानक बदल झाला. धनादेश घेण्यास केंद्रांकडून नकार दिला गेला. एखाद्या केंद्रात धनादेश स्वीकारत नसतील म्हणून काहींनी अन्य केंद्रांत तो देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही हाच अनुभव आला. संबंधित केंद्रांनी धनादेश आता स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे अनेकांना धक्का बसला. त्या मागील कारणांची स्पष्टता केली जात नसल्याने ग्राहकांना पायपीट करावी लागत आहे. या संदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता वेगळीच माहिती पुढे आली.
दर महिन्याला हजारो ग्राहक आपली देयके धनादेशाच्या माध्यमातून देतात. आतापर्यंत संकलन केंद्रात धनादेश दिल्यावर ग्राहकांच्या हाती लगेच पावती सोपविली जात होती. दर महिन्याला संकलित होणाऱ्या धनादेशांमधील काही धनादेश वटत नाहीत, परंतु त्यांची देयके प्राप्त झाल्याची पावती आधीच दिलेली असल्याने उपरोक्त हिशेब ठेवणे जिकिरीचे ठरते. ही बाब लक्षात आल्यावर मुख्यालयाने धनादेश वटल्यानंतर संबंधित ग्राहकांना पावती देण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचना प्राप्त झाल्यावर संकलन केंद्रांनी आपल्या कामात वाढ होणार असल्याने धनादेश स्वीकारण्यावर फुली मारल्याचे लक्षात येते. वास्तविक, महावितरणने ग्राहकांचे धनादेश स्वीकारू नये, अशी कोणतीही सूचना केली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. संकलन केंद्रांच्या विसंगत कार्य पद्धतीबाबत माहिती घेऊन त्यांना पुन्हा सूचित केले जाईल, असेही ते म्हणाले. महावितरणच्या सूचनेमुळे एखाद्या केंद्रात धनादेश स्वीकारला गेला तरी त्या ग्राहकांना संकलन केंद्रात दोनदा खेटे मारावे लागणार आहेत.

ऑनलाइन वीज देयक भरण्यासाठी क्लृप्ती?
महावितरणने ऑनलाइन वीज देयक भरणा सुविधाही उपलब्ध केली आहे. त्याचा लाभ जिल्ह्य़ातील लाखो ग्राहक घेत असले तरी धनादेशाद्वारे देयक भरणाऱ्या ग्राहकांनी ऑनलाइनचा मार्ग स्वीकारावा, यासाठी नवीन निर्देश दिले गेले की काय, अशी साशंकता काही जण व्यक्त करत आहेत. कमी त्रासात व विनाविलंब देयक भरण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय उत्तम असल्याचा दावा महावितरण करते. मागील वर्षांत जवळपास चार लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला होता. धनादेशाद्वारे देयक देणाऱ्या पण ई-बँकिंग प्रणालीचा अवलंब न करणाऱ्या ग्राहकांनी याच पद्धतीने देयके अदा करावीत, असा कंपनीचा प्रयत्न आहे काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

धनादेश बंधनकारक
ग्राहकांची देयके धनादेशाद्वारे स्वीकारणे महावितरण कंपनीला बंधनकारक आहे. कायद्यात धनादेशाद्वारे देयक स्वीकारले जाणार नाही, अशी कोणतीही तरतूद नाही. असे असताना काही देयकांवर धनादेश स्वीकारले जाणार नाही अशी सूचना दिली जाते. ज्या संकलन केंद्रात धनादेश स्वीकारले जाणार नाहीत, त्यांच्याकडून ग्राहकांनी लेखी नोंद करून ग्राहक न्याय मंचात दाद मागावी. ग्राहक संघटना या ग्राहकांच्या सोबत आहेत. महावितरणने चुकीची कार्यपद्धती अवलंबिणाऱ्या केंद्रांवर कारवाई करावी.
– सिद्धार्थ सोनी
(वीज ग्राहक संघटना)