22 January 2019

News Flash

‘सातवा वेतन’साठी पुन्हा संप करणार

कर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत महामंडळ अनेक कामांवर उधळपट्टी करीत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

( संग्रहीत छायाचित्र )

इंटकच्या एल्गार मेळाव्यात एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा

एकीकडे उधळपट्टी आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत एसटी महामंडळाचा कारभार सुरू असल्याचे टीकास्त्र सोडत १ मेपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) एल्गार मेळाव्यात देण्यात आला. मागील चार वर्षांत महामंडळाने एकही नवीन बसची खरेदी न करता भाडेतत्त्वावर शिवशाही गाडय़ा आणल्या आहेत त्यात कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे.

परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळावे, याकरिता  इंटकच्या वतीने गुरुवारी येथील चोपडा लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी, इंटकचे राज्य अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्यासह इतर पदाधिकारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे उपस्थित होते.

प्रारंभी छाजेड यांनी महामंडळाच्या अनागोंदी कारभाराची उदाहरणे देत त्यासाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरवले. वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी मागील वर्षी १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत संप पुकारला गेला होता. कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले, परंतु आजतागायत निर्णय घेतला गेला नाही. नवीन वेतन कराराची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार वेतन मिळायला हवे. कर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत महामंडळ अनेक कामांवर उधळपट्टी करीत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

बस, स्थानकांच्या स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटींचे कंत्राट देण्यात आले. वास्तविक, महामंडळात बस आणि स्थानकाच्या साफसफाईसाठी १२९३ स्वच्छक कर्मचारी आणि ५१४ सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या कामाचा विचार न करता खासगी ठेकेदाराला काम सोपवण्यात महामंडळाला स्वारस्य आहे. मागील चार वर्षांत महामंडळाने स्वत:ची एकही नवीन बस खरेदी केली नाही. फायद्याच्या मार्गावर भाडेतत्त्वावर आणलेल्या खासगी शिवशाही बसचा वापर होत आहे. दीड हजार शिवशाही बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप छाजेड यांनी केला.

राज्य परिवहन महामंडळाने मागील तीन वर्षांत घेतलेले निर्णय, कामे, खर्च याविषयीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. गणवेश खरेदी, ईटीआयएम तिकीट यंत्र देणाऱ्या कंपनीचा करार संपल्यानंतर यंत्र आणि सामग्री महामंडळास वर्ग करणे आवश्यक असताना पुन्हा त्याच कंपनीला ठेका देणे, बाह्य़ सल्लागाराची नेमणूक, चेसीस खरेदीत नियमांचे पालन न करणे, बस स्थानक नूतनीकरण आदी कामांत सावळागोंधळ घातला गेल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा छाजेड यांनी दिला.

महाराष्ट्रात संप झाल्यास देशातून पाठिंबा

महाराष्ट्रात इंटकने संप पुकारल्यास त्यास देशातील तीन कोटी सदस्यांचा पाठिंबा दिला जाईल, असे इंटकचे अध्यक्ष रेड्डी यांनी सांगितले. देशभरातील वाहन, चालक आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी होतील. राज्यासह केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे.

First Published on April 13, 2018 3:22 am

Web Title: msrtc employee 7th pay commission