शहरात आठ जणांना त्रास

नाशिक : संपूर्ण देश करोनाविरुद्ध लढा देत असताना दिल्लीत पाय पसरणाऱ्या म्युको मरकोसीस या नवीन आजाराचे रुग्ण नाशिकमध्ये आढळून आल्याने प्रशासनासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. करोनामुक्त झालेल्यांना  हा आजार होत असून आजाराचे गांभीर्य त्वरित लक्षात घेण्याची गरज असल्याचे नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ.शब्बीर इंदोरवाला यांनी सांगितले. सध्या शहर परिसरात या आजाराचे आठ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोना झाल्यावर आणि करोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील एका खासगी रूग्णालयातून म्युको मरकोसीस आजाराच्या १५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या आजाराचे वाढते प्रमाण धोकादायक असून याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. या आजारामुळे दृष्टी कायमस्वरूपी जाऊ शकते. तसेच मेंदू, मूत्रपिंडावरदेखील आघात होण्याची शक्यता असते. नाक कोरडे होणे, गाल सुजणे, डोळे लाल होणे किंवा डोळे दुखणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. दिल्लीत या रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य मंत्रालयाने देखील चिंता व्यक्त करीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. करोना होऊन गेल्यानंतर रोग प्रतिकारशक्ती जर कमी झाली तर हा आजार शरीरात प्रवेश करतो. आजार लवकर लक्षात न आल्याने ८० टक्के  रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. या आजाराला जिल्हा समन्यवक अधिकारी डॉ. अनंत पवार यांनीही दुजोरा दिला आहे.

म्युको मरकोसीस हा नवीन आजार असून करोना झालेल्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर तो होण्याची शक्यता असते. दृष्टी, मेंदू, मूत्रपिंडावर परिणाम होण्याची शक्यता असते. याचा उपचार करण्यासाठी तब्बल ८४ इंजेक्शन घ्यावी लागतात. डॉ. शब्बीर इंदोरवाला यांनी हा नवीन आजार असून या आजाराविषयी जनजागृती झालेली नसल्याकडे लक्ष वेधले. म्युको मरकोसीस हा आजार करोना झाल्यानंतर होत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण तो घातक आहे. वेळेवर उपचार करून घेणे महत्त्वाचे असून नाशिकमध्ये सध्या या आजाराचे आठ रुग्ण उपचार घेत आहेत. नाक कोरडे होणे, गाल सुजणे, डोळे लाल होणे किंवा डोळे दुखणे ही या आजाराची लक्षणे असून ती आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. इंदोरवाला यांनी नमूद के ले.