शिक्षकांच्या करोना चाचणीची तयारी

नाशिक : करोना महामारी आणि टाळेबंदीमुळे थांबलेले शैक्षणिक चक्र  हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असून नववी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता राज्य शासनाने जाहीर के लेल्या निर्णयानुसार पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्या संदर्भात शहरात प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत असून शिक्षकांची करोनाविषयक चाचणी, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे या संदर्भात बैठकांना वेग आला आहे. दुसरीकडे, के वळ तीन महिन्यांसाठी शाळा सुरू करण्याचा अट्टहास थकीत शुल्क जमा करण्यासाठीच होत असल्याची ओरड पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.

राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात के ली आहे. शासन निर्णयानुसार शहर परिसरात शाळा सुरू होण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. प्रशासनाधिकारी सुनीता धनगर, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महापालिका उपायुक्त खरे यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. महापालिके च्या १०२ तसेच खासगी व्यवस्थापनाच्या ३०३ अशा ४०५ शाळा २७ जानेवारी रोजी सुरू होणार आहेत.

सुमारे एक लाख १० हजार ७७३ विद्यार्थी शाळेत येणार आहेत. याशिवाय महापालिका तसेच खासगी शाळेतील इंग्रजी, विज्ञान, गणित विषय शिकवणारे असे एक हजार ३७६ शिक्षक आणि मुख्याध्यापक, कारकू न, शिपाई अशा दोन हजार २४९ जणांची करोनाविषयक चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी कु ठल्या केंद्रावर होईल, त्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती प्रशासनाधिकारी धनगर यांनी दिली.

महापालिका प्रशासनाकडून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन करण्यात येत असताना विद्यार्थी आणि पालकांचा त्यांच्या या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी संमिश्र प्रतिक्रि या येत आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून शालेय स्तरावर पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात संमतिपत्र भरून घेण्यात येत आहे.

बहुतांश पालकांकडून शुल्क वसुलीसाठी शाळा सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे. काही पालकांपुढे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी वाहतुकीची समस्या आहे. टाळेबंदीनंतर शहर बससेवा अजूनही पूर्णपणे सुरू झालेली नाही. के वळ काही प्रमुख मार्गावर आणि कमी संख्येने बस धावत आहेत. व्हॅन, रिक्षा यांसारख्या खासगी वाहनांमध्ये करोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालक सध्या तरी खासगी वाहनांमधून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यापेक्षा ऑनलाइन शिक्षणाला काही जणांकडून पसंती मिळत आहे. अशा संमिश्र वातावरणात पाचवीपासून सुरू होणाऱ्या वर्गाना विद्यार्थी आणि पालकांकडून कितपत प्रतिसाद मिळतो, याविषयी प्रशासनाला चिंता आहे.