महापौर रंजना भानसी यांचा आरोप

पालिकेच्या शाळेत शौचालयालगत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता. डॉक्टरचा पत्ता नाही. शाळा आणि रुग्णालयाची दुरवस्था मांडत शहरात पसरलेल्या स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि तापाच्या साथीला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला.

सत्ताधारी भाजपच्यावतीने गुरुवारी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत महापौरांनी प्रभाग क्रमांक १९ आणि २२ मधील पालिका शाळा, दवाखाना, रुग्णालयासह रस्त्यांची पाहणी करून स्थानिक नगरसेवक, नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेली स्थिती पत्रकार परिषदेत मांडत महापौरांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शरसंधान साधले. शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू, तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. साथीच्या आजारांनी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असताना सत्ताधारी

‘भाजप’ आणि पालिका प्रशासन ठोस उपाय योजना करीत नसल्याची तोफ डागत विरोधी शिवसेनेने ‘दत्तक पित्या’च्या नावाने निवेदन देत खोचक मागणी केली होती.

विरोधी शिवसेनेने ‘दत्तक पित्या’च्या नावाने निवेदन देत खोचक मागणी केली होती. पालिकेच्या शाळा, रुग्णालयात स्वच्छता राखण्याची दक्षता घेतली जात नाही. पालिका रुग्णालयाच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य अन् दरुगधी पसरलेली होती. तिथे डॉक्टरचा पत्ता नव्हता. खिडक्याची तावदाने तुटलेली होती. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष असल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यांचा आरोग्य विभागावर अंकुश नाही. साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाले असून आयुक्तांनी आरोग्य विभागाला जाब विचारायला हवा, असेही महापौरांनी सांगितले.

‘पालिका रुग्णालयात २४ तास सेवा द्या’

स्वाइन फ्लू, डेंग्यूसारखे आजार बळावत असताना पालिका प्रशासनाची शहरवासीयांना २४ तास सेवा देण्याची जबाबदारी आहे. पालिकेच्या सर्व विभागातील रुग्णालयांमध्ये तशी व्यवस्था करावी, असे निर्देश महापौर रंजना भानसी यांनी दिले. महापौराच्या दौऱ्यावेळी मुख्यालयासह नाशिकरोड विभागातील अनेक अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून उपस्थित न राहणाऱ्यांना नोटीस बजावली जाणार असल्याचे भानसी यांनी स्पष्ट केले.

शनिवारी ‘वॉक विथ कमिशनर’

‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महापौरांनी प्रशासनाला जबाबदार धरले असताना याच दिवशी महापालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम शनिवारी होणार असल्याचे जाहीर झाले. शनिवारी सकाळी साडे सहा वाजता पंचवटीतील तपोवन रस्त्यावरील श्री शर्वायेश्वर महादेव मंदिराजवळ हा उपक्रम होणार आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी, शहर विकासाच्या दृष्टीने उपाय योजना आदींबाबत लेखी स्वरुपात उपक्रमस्थळी माहिती द्यावी. त्यानुसार टोकन क्रमांक देऊन नागरिकांना आयुक्तांसमोर आपले म्हणणे मांडता येणार आहे.