मुख्य रस्त्यावरील मोठय़ा अतिक्रमणांऐवजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आता अंतर्गत भागातील लहानसहान अतिक्रमणे हटविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी गंगापूर नाका परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी तीन अतिक्रमणे काढण्यात आली तर अतिक्रमणधारकाने एक अतिक्रमण स्वत:हून काढून घेतल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

सिंहस्थापूर्वी शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली गेली होती. पुढील काळात ही मोहीम अधूनमधून राबविली जात असली तरी तिचा आवाका एका विशिष्ट मर्यादेत असल्याचे दिसून येते. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेने यापूर्वी लाल रेषेच्या खुणा करीत कारवाईचा इशारा दिला होता. त्यातील काही अतिक्रमणे हटविली गेली असली तरी काही अतिक्रमणे अद्याप ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. या स्थितीत पालिका लुटुपुटुची लढाई खेळत असल्याचे चित्र आहे. ज्या अनधिकृत बांधकामांविषयी तक्रारी येतात, प्रामुख्याने त्यांच्यावर छाननी करून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी गंगापूर नाका येथील हर्ष अपार्टमेंट येथे ही मोहीम राबविली गेली. संयुक्त गच्चीत उभारलेली भिंत आणि बांधकाम हटविले गेले. या ठिकाणी कुणाल कपूर यांचे स्टोअर रूम आणि शौचालयाचे अतिक्रमण होते. संबंधितांनी ते स्वत:हून काढले. आनंदवल्ली परिसरातील मोनार्क सोसायटीत दिनकर दप्तरी यांच्या दुकानासमोरील लोखंडी पार्टिशन, रेस्टॉरंटचे काऊंटर हटविण्यात आले. तसेच मुख्यार अहमद खान यांच्या समाधान सोफा कुशनसमोरील शेडही हटविले गेले. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविली गेली. या वेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. वारंवार आवाहन करूनही बेकायदेशीर बांधकामे काढून घेण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पालिकेमार्फत ती हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.