लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : महापालिके च्या याआधीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढले होते. परंतु, जी जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आली; तिथेही राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांना एबी अर्ज देऊन टाकले. त्यामुळे मतविभागणी होऊन काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला. ऐनवेळी गोंधळ उडाला होता. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र आलीच तर राष्ट्रवादीसोबत शिवसेनाही समाविष्ट असेल. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी तसाच गोंधळ उडू नये म्हणून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ताक फुंकून पिण्याचे धोरण अवलंबले आहे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीची धास्ती असल्याची बाब प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघड झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे थोरात यांनी जाणून घेतले. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी अनेकांनी केली. काँग्रेस सर्वच्या सर्व जागेवर आपले उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी मागील महापालिका निवडणुकीतील मित्रपक्षाबरोबरचे अनुभव कथन केले. गतवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. परंतु, मित्रपक्षाने काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या जागेवर  ऐनवेळी आपले अधिकृत उमेदवार उभे करून काँग्रेसच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचे काम केल्याचे आहेर यांनी नमूद केले.

आगामी निवडणुकीत आघाडी झाली तर शिवसेनाही त्यात सहभागी असू शकेल. ऐनवेळी असे गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समितीची गरज मांडली गेल्याचे सांगितले जाते. आगामी महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना करताना तो दोन सदस्यांचा हवा असा आग्रह धरण्यात आला. दोनचा प्रभाग निवडणूक लढण्यासाठी योग्य राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे एक पुरुष आणि एक महिला असे उमेदवार देता येतील. थोरात यांनी आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजे या विषयावर चर्चा केली. यावेळी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता, पाटील, गटनेता शाहू खैरे, वत्सलाताई खैरे, नगरसेवक राहुल दिवे आदी उपस्थित होते.

आरक्षित भूखंडाची रक्कम देण्यात गैरव्यवहाराची तक्रार

महापालिकेत आरक्षित भूखंडाची रक्कम देण्याच्या प्रक्रियेत प्रचंड मोठा गैरव्यवहार होत असल्याची तक्रार काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी मांडून महापालिकेच्या कारभाराची शासनाने चौकशी करण्याची मागणी केली. महापालिकेतील चुकीच्या कामांविषयी त्यांनी माहिती दिली. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.