महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पंधरवडय़ापासून सुरू असलेला प्रचार रविवारी थंडावला. सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले असून त्याच्या तयारीत उमेदवार गुंतले आहेत.

महापालिकेच्या १२२ जागांसाठी ३१ प्रभागांमधून योग्य उमेदवाराची निवड नाशिककरांना करावयाची आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३३८, तर १४६ गणांसाठी ६७४ उमेदवार रिंगणात असून उमेदवारी मागूनही न मिळाल्याने सर्वपक्षीयांमधील अनेक नाराज कार्यकर्ते अपक्ष म्हणून उमेदवारी करीत आहेत. खासदार, आमदार, माजी आमदार यांच्या घरातील व्यक्तींना कशी सहजपणे उमेदवारी मिळते, अशा उमेदवारांपेक्षा आपण पक्षात कितीतरी वर्षांनी ज्येष्ठ असूनही उमेदवारीत का डावलण्यात येते, असा या नाराज अपक्षांचा प्रश्न आहे. काही बंडखोरांची पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून साम-दाम-दंड या नीतीने समजूत काढण्यात आली असली तरी त्यास पुरून उरलेल्या काहींनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी अनेक उमेदवारांनी आपआपल्या प्रभागांमध्ये दणकेबाज फेरी काढण्यावर भर दिला. यावेळची महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मेळावा घेतला. तर, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी दोन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. अनंत कान्हेरे मैदान या निवडणुकीत इतिहासात प्रथमच सलग तीन प्रचार सभांचे साक्षीदार ठरले. गर्दी जमत असल्याने ‘ठाकरे कुटुंबियांचे मैदान’ अशी ओळख असलेल्या या मैदानात या निवडणुकीत पहिली सभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दुसरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि तिसरी सभा भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली. या तीनही नेत्यांना ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान भरेल इतकी गर्दी जमली नाही. ठाकरे बंधूंच्या सभांना बऱ्यापैकी गर्दी असली तरी फडणवीस यांच्या सभेत निम्मे मैदान रिकामेच होते. रविवारी वडाळा भागात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेत तर अगदीच तुरळक उपस्थिती होती. याशिवाय जिल्हा परिषदेसाठी जयकुमार रावल, दादा भुसे, विष्णू सावरा या मंत्र्यांच्याही सभा झाल्या. प्रचार सभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाच सर्वजण दिसून आले. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये केलेल्या विकास कामांचे सचित्र सादरीकरण करीत विकास करण्यासाठी आपणास पुन्हा कौल देण्याचे आवाहन केले. भाजपच्या वतीने गुंडांना देण्यात येत असलेल्या आश्रयाबद्दल ठाकरे बंधूंसह सर्वच विरोधी नेत्यांनी टीका केली.