‘महापौर आपल्या दारी’ उपक्रम

पालिका रुग्णालयाची दुरवस्था समोर

आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी ‘भाजप’ने सुरू केलेल्या ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाची सुरुवातच ‘नागरिकांच्या गाठीभेटी कमी अन् भ्रमंती अधिक’ अशी झाल्याचे पाहावयास मिळाले. महापौर रंजना भानसी यांच्यासमवेत सभागृह नेते दिनकर पाटील वगळता ‘भाजप’चे कोणी प्रमुख पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले नाहीत. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि काही निवडक अधिकाऱ्यांचा लवाजमा दिमतीला होता.

महापौरांचा उपक्रम अधिक्याने मोटारीतून भ्रमंतीने झाला. पालिकेचे दवाखाने, रस्त्यांची अवस्था, औषधांचा तुटवडा आदींची माहिती जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. या उपक्रमात स्थानिकांना थेट फारशा तक्रारी मांडता आल्या नाहीत. त्यांनी जिथे जिथे भेट दिली, केवळ तिथे उपस्थित असणाऱ्यांना गाऱ्हाणे मांडता आले.

महापालिका आयुक्त मुंढे यांना हटविणे शक्य नसल्याची जाणीव झाल्यानंतर ‘भाजप’ पदाधिकाऱ्यांनी विरोधाची धार कायम ठेवत पद्धत बदलली. ‘महापौर आपल्या दारी’ हा त्याचाच एक भाग आहे. गुरुवारी नाशिकरोड विभागातील प्रभाग १९ आणि २२ मध्ये हा उपक्रम पार पडला. सकाळी साडेनऊच्या सुमारास महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरूवात झाली.

नाशिकरोड विभागात १९ आणि २२ हे विस्तृत आकाराचे प्रभाग असून एका प्रभागात चार गावे समाविष्ट आहेत. सिन्नर फाटा, चेहेडी पंपिंग, विहितगाव, वडनेर, पिंपळगाव खांब आदी भागाची महापौरांनी पाहणी केली. या दौऱ्यात पालिकेच्या रुग्णालयाची दुरावस्था प्रकर्षांने समोर आली. दरुगधी पसरलेल्या रुग्णालयात फरशा फुटलेल्या होत्या. जुनाट खाटा, फाटलेल्या उशांचे दर्शन घडले. काही कर्मचारी गैरहजर होते. जुनाट, बंद पडलेली उपकरणे पाहून महापौर संतप्त झाल्या. रुग्णांशी संवाद साधतांना औषधे मिळत नसल्याचे निदर्शनास आले.

सामनगाव रस्त्यासह प्रभागातील इतर रस्त्यांच्या स्थितीचे महापौरांनी अवलोकन केले. पाहणी करताना तिथे उपस्थित असणाऱ्यांशी संवाद साधून तक्रारी जाणून घेतल्या. मोटारीतून सुरू झालेला महापौरांचा दौरा दुपारी अडीचच्या सुमारास संपला. या दौऱ्यात काही ‘भाजप’ कार्यकर्त्यांच्या घरी त्यांनी भेट दिली. महापौर ज्या भागातून मार्गस्थ झाल्या, जिथे थांबल्या केवळ तिथेच नागरिकांना संवाद साधता आला. पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले नव्हते.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात प्रशासन पूर्ण क्षमतेने कामाला लागते. नागरिकांच्या लेखी तक्रारी घेऊन नंतर त्यांना आयुक्तांशी संवाद साधण्याची संधी मिळते. महापौर आणि आयुक्तांच्या उपक्रमांची तुलना स्थानिक नागरिक आपापल्यापरीने करत आहेत.