News Flash

महापालिकेची स्पुटनिक लस खरेदी अडचणीत

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी महापालिका प्रशासनाने स्पुटनिक या रशियन लस खरेदीची केलेली तयारी अडचणीत आली आहे.

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण रखडण्याची चिन्हे

नाशिक : १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी महापालिका प्रशासनाने स्पुटनिक या रशियन लस खरेदीची केलेली तयारी अडचणीत आली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निविदेत आलेल्या दरानुसार नाशिक महापालिकेने पाच लाख लसमात्रा खरेदीची तयारी केली होती. बृहन्मुंबई महापालिकेत निविदा भरणाऱ्या एकालाही लसींबाबत अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाही. त्यामुळे संबंधितांना अपात्र ठरवले गेले. यामुळे नाशिककरांना आता शासकीय लस पुरवठय़ावर अवलंबून रहावे लागणार आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरास बिकट स्थितीला तोंड द्यावे लागले. संभाव्य तिसऱ्या लाटेत पुन्हा तीच स्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेने १८ ते ४४ वयोगटाच्या जलद लसीकरणासाठी स्वत: लस खरेदीचे निश्चित केले होते. राज्यातील बृहन्मुंबई, पुण्यासह इतरही काही महापालिकांनी लसीकरणासाठी जागतिक निविदा काढली. नाशिक महापालिकेने स्वतंत्र निविदा काढल्यास त्यात आणखी वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आधी लशीसाठी ज्या महापालिकेने जागतिक निविदा काढली, त्यांच्या मागणीत नाशिक महापालिकेची लस मागणी समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले. त्या अनुषंगाने मागील महिन्यात पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाशी चर्चा केली होती. मुंबई महापालिकेला रशियाच्या स्पुटनिक लशीसाठी एकाने पुरवठय़ाची तयारी दर्शविली होती. ती निविदा भरणाऱ्याने नाशिक येथे आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी महापालिकेने बृहन्मुंबई महापालिकेला दिलेल्या दरानुसार पाच लाख लसमात्रा खरेदी करण्याची तयारी असल्याचे पत्रही महापालिकेने पुरवठादारास दिले होते.

शहरात १८ ते ४४ वयोगटाचे अंदाजे पाच ते साडेपाच लाख नागरिक आहेत. स्पुटनिक या नव्याने विकसित झालेल्या लशीत एका मात्रेने प्रतिकार शक्तीत वाढ होते. ती मिळाल्यास लसीकरण वेगात होईल असा पालिकेचा अंदाज होता. परंतु, हे नियोजन दृष्टीपथास येणे अवघड झाले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत ज्या पुरवठादारांनी निविदा भरली, त्यांना त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे सादर करता आले नाहीत.

संबंधितांकडे आयात-निर्यातीचे प्रमाणपत्र, त्या कंपनीचे अधिकृत वितरक असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे संबंधितांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे स्पुटनिकसह अन्य कंपनीची लस खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. जोपर्यंत अधिकृत पुरवठादार त्या प्रक्रियेत सहभागी होत नाही, तोपर्यंत ती पूर्णत्वास जाणे अवघड बनले आहे. या घडामोडींचा परिणाम नाशिक महापालिकेच्या लस खरेदीवर झाला आहे.

केंद्र, राज्य सरकार वेगवेगळ्या कंपन्यांच्या लस खरेदीसाठी प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून पुढील काळात लसीचा पुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे. शासनाकडून होणाऱ्या लस पुरवठय़ावर शहरातील लसीकरणाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या पुरवठादारांकडे लस कंपन्यांचे अधिकृत वितरक, आयात-निर्यातीशी संबंधित कागदपत्रे नव्हती. त्यामुळे स्पुटनिक, फायझर लस देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. देशात चार, पाच वेगवेगळ्या कंपन्यांच्या लस उपलब्ध होत आहेत. स्पुटनिकचे देशांतर्गत उत्पादन होणार आह्े. त्यामुळे जूनच्या मध्यानंतर पुढील तीन महिन्यात शासकीय पातळीवरून लस पुरवठा वाढणार आहे. तसेच काही खासगी रुग्णालये लस खरेदी करीत आहे. त्यामुळे लसीकरणास वेग येईल.

– कैलास जाधव (आयुक्त, महापालिका)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:02 am

Web Title: municipal sputnik vaccine purchase difficulty ssh 93
Next Stories
1 छोटय़ा भूमिका करणाऱ्या कलाकारांची पावले अन्य व्यवसायांकडे
2 संभाजीराजे भोसले यांनी आंदोलन पुढे ढकलावे
3 नियोजनबध्द उपक्रमांमुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय सन्मान
Just Now!
X