सिंहस्थात स्वच्छतेतील कामचुकारपणा टाळण्यासाठी अस्तित्वात आणल्या गेलेल्या ‘टॅब’द्वारे दैनंदिन छायाचित्र हजेरीची पद्धती आता महापालिकेतील कायमस्वरूपी सफाई कामगारांसाठी लागू करण्यात येत आहे. शाही पर्वणीनंतर पडून असणारे पावणेदोनशे ‘टॅब’ सफाई कामगारांच्या हजेरीबरोबर पाणीपट्टीचे जागेवर देयक देणे तसेच घरपट्टी संदर्भातील सर्वेक्षणात उपयोगात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. उपरोक्त प्रणालीद्वारे प्रत्येक कामगाराची कामावर येण्याची व जाण्याची वेळ, हजेरी नोंदविणारी व्यक्ती तीच आहे की नाही, याची पडताळणी होईल. तसेच संबंधित कामगार किती वाजता आला, किती वाजता काम संपले आणि कोणत्या ठिकाणी तो कार्यरत होता, याची स्पष्टता होणार असल्याने शहरात स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे होईल, अशी आशा आहे.
सिंहस्थ काळात सार्वजनिक स्वच्छतेच्या कामात कामचुकारपणा होऊन शहर कचऱ्याच्या वेढय़ात सापडू नये यासाठी महापालिकेने खास संगणकीय प्रणाली विकसित केली. इतकेच नव्हे तर, त्यासाठी १७५ टॅबची खरेदी करण्यात आली. त्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या हजारो सफाई कामगारांची ‘टॅब’द्वारे छायाचित्र काढून दैनंदिन हजेरी घेतली गेली होती. लाखो भाविकांच्या गदारोळात सफाई कामगारांच्या कामांवर नजर ठेवण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरली. भाविकांच्या गर्दीत साफसफाईची कामे योग्य पद्धतीने होतात की नाही, यावर नजर ठेवण्यात आली. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने पालिकेच्या नियमित सफाई कामगारांसाठी त्या पद्धतीचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. सप्टेंबर महिन्यात शाही पर्वणीची अखेरची मुख्य तिथी झाल्यानंतर आजतागायत बहुतांश टॅब वापराविना पडून आहेत. त्याचा या निमित्ताने वापर सुरू होईल.
महापालिकेत सध्या १९९३ सफाई कामगार आहेत. या प्रणालीत त्यांच्या नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्येकाचे नाव, पत्ता, काम करण्याचे क्षेत्र आणि छायाचित्र ही माहिती समाविष्ट येत आहे. टॅबद्वारे हजेरी कशी घ्यायची याचे प्रशिक्षणही स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहे.
माहिती समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच या पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. ही पद्धती अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक भागात स्वच्छता निरीक्षक दररोज टॅबद्वारे संबंधितांचे छायाचित्र काढून हजेरी घेतील. एखाद्या नावावर कोणी दुसरा कर्मचारी छुप्या पद्धतीने कार्यरत राहिल्यास आज्ञावलीतून ती बाब उघड होईल.

तारीखनिहाय प्रत्येकाची कामावर येण्याची व जाण्याची वेळ नोंदविली जाईल. तो कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे याची स्पष्टता होईल. महिना संपल्यानंतर प्रत्येकाच्या हजेरीची संपूर्ण माहिती एका क्षणात टॅबच्या पटलावर सादर होईल, अशी आज्ञावलीची रचना आहे. दैनंदिन कामकाजात कामचुकारपणा टाळण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. टॅबचा इतरही कामात उपयोग करवून घेण्याचा संगणक विभागाचा प्रयत्न आहे. पाणीपट्टीची देयके ‘मीटर रीडिंग’ घेऊन नंतर पाठविली जातात. टॅबद्वारे छायाचित्र काढून जागेवर पाणीपट्टीचे देयक देण्याचे नियोजन आहे. तसेच घरपट्टीच्या सर्वेक्षणात त्याचा वापर केला जाईल.
सिंहस्थात खरेदी केलेल्या टॅबचा वापर पालिकेतील सफाई कामगारांसाठी लवकरच केला जाणार आहे. सध्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी टॅबचा वापर केला जातो. सफाई कामगारांची माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांच्या दैनंदिन हजेरीचे काम सुरू होईल.
– डॉ. विजय डेकाटे
आरोग्य अधिकारी, महापालिका