इतिहासप्रेमींसाठी खजिना असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेले पुरातत्त्व विभागाचे वस्तुसंग्रहालय  महापालिका आणि पुरातत्त्व विभाग यांच्यातील वादात दुर्लक्षित राहिले आहे. या संदर्भात महापालिका आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात आजवर करार झाला नसल्याने प्रादेशिक वस्तुसंग्रहालय अंधारात असल्याचे उघड झाले आहे.

नाशिककरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे दादासाहेब फाळके स्मारक परिसराची बिकट स्थिती सर्वश्रुत आहे. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी असणारी पर्यटकांची दिवसागणिक वाढणारी संख्या लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने आपले प्रादेशिक संग्रहालय स्मारक परिसरात हलविण्याचे ठरविले. प्रादेशिक संग्रहालयाचे महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन महापालिका अधिकाऱ्यांनी त्यास मान्यता देत फाळके स्मारक परिसरातील क्रमांक तीनचे दालन वस्तुसंग्रहालयासाठी उपलब्ध करून दिले. यासाठी महिन्याकाठी २०० रुपये नाममात्र शुल्क आकारणी सुरू केली. त्यावेळी स्मारक परिसरातील दालन पाहत पुरातत्त्व विभागाने या जागेच्या वापराबाबत काही अटी ठेवल्या. तशाच काही अटी महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आल्या आहेत.

फाळके स्मारकच्या परिसरात सुरू झालेल्या वस्तुसंग्रहालयात काही पाषाण शिल्प, दुर्मीळ नाणी, १२ व्या शतकांपासून १८ व्या शतकापर्यंत असलेल्या काही दुर्मीळ मूर्ती, युद्धात वापरलेले शस्त्र ठेवण्यात आले आहेत. वास्तविक हा खजिना दुर्मीळ असला तरी राज्यातील इतर वस्तुसंग्रहालयाच्या मानाने तोकडाच आहे.

फाळके स्मारक परिसरात येणारे पर्यटक बुद्ध विहार, परिसरातील बगीचा, रंगीत कारंजा, त्यानंतर दादासाहेब फाळके यांचे स्मारक, चित्रनगरीचा प्रवास अनुभवत दालन क्रमांक तीनमधील वस्तुसंग्रहालयात येत असे. संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर हा जथ्था पुढे खवय्येगिरीसाठी मार्गस्थ होत असे.

नंतरच्या काळात स्मारक परिसरातील गर्दी रोडावली गेली. आता त्याची जागा प्रेमी युगल, मद्यपींनी घेतली आहे. शहरापासून दूर असलेल्या स्मारकाकडे नाशिककरांनी तसा कानाडोळाच केला. याची खंत महापालिकेला नाही. उलट प्रेमी युगलांसह मद्यपींना हे आवार खुले केले की काय, अशी साशंकता येथे येणाऱ्या पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.

महापालिका-पुरातत्त्व विभाग यांच्यातील जाचक अटी-शर्तीमुळे उभयतांमध्ये जागेबाबतचा आवश्यक करार होऊ शकला नाही. महापालिकेने स्मारक परिसर ठेकेदाराच्या ताब्यात दिल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली. ठेकेदार किंवा महापालिकेकडे जागा वापरताना येणाऱ्या अडचणी, या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांसाठी पुरातत्त्व विभागाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र महापालिकेने त्याकडे कानाडोळा करत चेंडू ठेकेदाराच्या कोर्टात ढकलला. यामुळे प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाला महापालिकेच्या जागेत आजही अपेक्षित काम करता आले नाही. फाळके स्मारक परिसर बीओटी तत्त्वावर देण्याचा महापालिकेचा मानस असल्याने वस्तुसंग्रहालयावर टांगती तलवार आहे.

वस्तुसंग्रहालयातील समस्या

सद्यस्थितीत वस्तुसंग्रहालय दालनाच्या काही काचा तुटल्या आहेत. वस्तू संग्रहालयाच्या प्रसिध्दीसाठी त्यांना काही फलक लावायचे आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. अन्य काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उघडय़ा खिडक्यांमुळे पक्ष्यांचा वावर आहे. शिल्प कलाकृतींवर हे पक्षी कचरा करतात. परिसरात मोकाट फिरणारे प्रेमी युगल किंवा मद्यपी संग्रहालयाच्या दर्शनी भागासमोरील मोकळ्या सज्जाचा वापर करतात. यामुळे येथील सुरक्षिततेविषयीही साशंकता व्यक्त होत आहे. याचा अप्रत्यक्ष फटका वस्तू संग्रहालयास भेट देणाऱ्यांच्या संख्येवर झाला असून सध्या ही गर्दी महिन्याकाठी १००-३०० वर आली आहे.