27 January 2020

News Flash

जमावाच्या हिंसेविरोधात मुस्लीम समाजाचा मोर्चा

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दुपारी भद्रकालीतून मोर्चाला सुरुवात झाली.

भद्रकाली परिसरातून निघालेल्या मोर्चात सहभागी मुस्लीम बांधव.

नाशिक : जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या वाढत्या घटनांमुळे देशभरातील मुस्लीम आणि अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राज्य, केंद्र सरकारने देशातील वाढता द्वेष, विखार नष्ट करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत यासाठी बहुजन मुस्लीम संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दुपारी भद्रकालीतून मोर्चाला सुरुवात झाली. स्मार्ट रस्ता कामामुळे मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी ईदगाह मैदानावर जावे लागले. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

काही कट्टरतावादी संघटनांची कार्यपद्धती, अपप्रचार यामुळे देशाची एकता, अखंडतेला धोका निर्माण झाला असून त्याबद्दल सरकारने बाळगलेले मौन संशयास्पद आहे. गोवंश हत्येसह अन्य कारणांवरून अल्पसंख्याक समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. विशिष्ट विचारसरणीने प्रेरित झालेल्या झुंडशाहीने देशाच्या प्रतिमेला धक्का बसत असून अल्पसंख्याक समाजाच्या मनातील भीती दूर करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

मुस्लीम समाजासह अल्पसंख्याकांना विशेष सुरक्षा द्यावी, जमावाकडून होणाऱ्या हल्ल्याच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालयात सुनावणी, या प्रकरणात आरोपींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, जमावाकडून होणाऱ्या हिंसेविरोधात खास कायदा करावा, मुस्लीम समाजाला शिक्षणात न्यायालयाने मंजूर केलेले आरक्षण त्वरित लागू करावे, भडक भाषणे देणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

खातीब ए शहर हाफिज हिसामोद्दीन खातीब, काजी ए शहर काजी मोईजोद्दिन सय्यद आदींच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले. मोर्चात संघर्ष समितीचे उपाध्यक्ष शेख आसिफ, किरण मोहिते, असलम खान आदी सहभागी झाले होते.

भद्रकाली परिसरातून निघालेल्या मोर्चात सहभागी मुस्लीम बांधव.

First Published on July 16, 2019 2:00 am

Web Title: muslim community protest against mob lynching in nashik zws 70
Next Stories
1 दांडी बहाद्दरांना घरचा रस्ता दाखवा 
2 अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर
3 पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकमध्ये जनजीवन ठप्प
Just Now!
X