पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन

नाशिक : उंटवाडी रोडवरील मुत्थूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा असफल करण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या संजू सॅम्युअल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरातील आधार गेला. सॅम्युअल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरावर ओढावलेल्या संकटात मदतीचा हात पुढे करत नाशिक पोलिसांनी ‘खाकी’तील माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

मुत्थूट फायनान्स कार्यालयात १४ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाच जणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेले लेखापाल संजू सॅम्युअल (२९) आतील बाजूस आपले काम करत होते. बाहेरील गोंधळामुळे त्यांना बाहेर काय सुरू आहे, याचा अंदाज आला. त्यावेळी कार्यालयात १३ कोटींचे सोने आणि काही रोख रक्कम होती. प्रसंगावधान राखत सॅम्युअल यांनी कक्षात बसूनच धोक्याचा इशारा देणारी बेल दाबली.

बेलच्या आवाजामुळे दरोडेखोर भेदरले. त्यांनी सॅम्युअल आणि त्यांच्या सहकाऱ्याला कक्षातून बाहेर काढले. बाहेर आणताना दरोडेखोरांपैकी एकाने सॅम्युअल यांच्या डोक्यात बंदूक मारत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या आक्रमकतेला न जुमानता सॅम्युअल यांनी थेट दरोडेखोराच्या कानशिलात लगावत प्रतिकाराचा प्रयत्न केला. या अनपेक्षित हल्ल्याने संतप्त झालेल्या एकाने सॅम्युअल यांच्यावर जवळून गोळीबार केला. पहिलीच गोळी वर्मी लागल्याने सॅम्युअल खाली कोसळले. त्यानंतरही दरोडेखोरांनी अमानुषपणे त्यांच्या देहावर लाथा मारत तीन गोळ्या झाडल्या. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्ह्य़ातील क्लिष्टता पाहता पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीसाठी तीन तपासी पथकांना प्रत्येकी ७० हजार रुपये असे दोन लाख १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.  यामध्ये निरीक्षक विजय ढमाळ, आनंदा वाघ आणि नम्रता देसाई यांच्या पथकाचा समावेश आहे. या सर्व नाटय़मय घडामोडीत पोलिसांइतकेच सॅम्युअल यांनी आपले कर्तव्य चोख बजावल्याने पोलिसांच्या तपासी पथकांनी पारितोषिकाची संपूर्ण रक्कम सॅम्युअल यांच्या कुटुंबीयास देण्याचे ठरविले आहे.

सॅम्युअल हे घरातील कर्ते होते. दोन वर्षांपूर्वी ते मुत्थूट फायनान्समध्ये नोकरीस लागले. वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहान भाऊ अद्याप शिकत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, लहान भाऊ, दहा महिन्यांचा मुलगा आहे. सॅम्युअल यांच्या मृत्यूमुळे घरातील आर्थिक आधार हरवल्याने त्या कुटुंबासाठी नाशिक पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. लवकरच पारितोषिकाची संपूर्ण रक्कम सॅम्युअल यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाईल, असे पोलीस उपायुक्त आर. आर. पाटील यांनी सांगितले.