‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत महापौरांची अपेक्षा

नाशिक : शहरातील करोना संक्रमणाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वत्र प्रबोधन करीत आहे. परंतु अद्याप नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. करोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले.

राज्य शासनाच्या ‘माझे कु टुंब- माझी जबाबदारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून करोनामुक्त नाशिक योजनेच्या शुभारंभाचा मुख्य कार्यक्रम मंगळवारी नाशिक पूर्व विभागाच्या कार्यालयात झाला. या वेळी महापौरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पालिका आयुक्त कै लास जाधव, सभागृह नेते सतीश सोनवणे, या मोहिमेचे संनियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे आदी उपस्थित होते. वैद्यकीय पथकांना प्रातिनिधिक स्वरूपात थर्मल गनसारख्या साहित्याचा संच देऊन या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. महापालिकेच्या अन्य पाचही विभागांत या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

महापौर कुलकर्णी यांनी करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याकडे लक्ष वेधले. शहरवासीयांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास नाशिकमधून करोना हद्दपार होईल, असा विश्वास व्यक्त केला. महापालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आयुक्त कैलास जाधव यांनी करोनावर जोपर्यंत लस किंवा औषध बाजारात येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रशासन सर्व स्तरावर काम करत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. पश्चिम विभागात मोहिमेचा शुभारंभ करताना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महाविकास आघाडी सरकारने करोनावर मात करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेमध्ये सर्वानी सहभागी होऊन या मोहिमेला लोकचळवळ बनवावी आणि महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्याचे आवाहन केले.