जिल्ह्य़ातील सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची तयारी

जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘नाम फाऊंडेशन’च्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मदतीचे वितरण अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. २०१५ या वर्षांत वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्या ८५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची तयारी फाऊंडेशनने दर्शविली आहे. आर्थिक मदत देताना शासकीय पातळीवर काही निकष असतात. त्याअंतर्गत शासनाकडून मदतीसाठी काही कुटुंबीय पात्र तर काही अपात्र ठरतात.

तथापि, शासकीय निकषांच्या पलीकडे जाऊन फाऊंडेशन विचार केला आहे. शेतकरी आत्महत्या कोणत्याही कारणांनी झाली असली तरी कुटुंबीय नाहक त्यात भरडले जातात. ही बाब लक्षात घेऊन नाम सर्वाच्या मदतीसाठी पुढे आली आहे. त्यासाठी संबंधितांच्या वारसांनी आधारकार्डसह संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे सामाजिक बांधिलकी जपत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन आर्थिक मदत करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१५ वर्षांत जिल्ह्य़ात ८५ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात बागलाण १२, चांदवड सात, देवळा व दिंडोरी प्रत्येकी तीन, निफाड १५, सिन्नर पाच, त्र्यंबकेश्वर व येवला प्रत्येकी दोन अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे.

या सर्व शेतकऱ्यांच्या वारसदाराला नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे धनादेश शुक्रवारी वितरित केले जाणार आहेत. दुपारी दोन वाजता गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य संकुलातील ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम होईल. यासाठी जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या आधारकार्डच्या झेरॉक्सची आवश्यकता आहे. संबंधित वारसदारांचा भ्रमणध्वनी क्रमांक फाऊंडेशनचे राजाभाऊ शेळके (९४२२७४२७९०, ९०११६१५९१०) आणि चंद्रकांत मोरे (९०४९८९५४५४) यांच्याकडे द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारी पातळीवरून मदत देताना बाळगल्या जाणाऱ्या निकषांच्या फुटपट्टीला फाऊंडशनने छेद देऊन नवीन पायंडा पाडला आहे.

प्रवीण पवारशी फाऊंडेशनचा संबंध नाही

नाशिक जिल्ह्य़ात प्रवीण पवार नावाची व्यक्ती स्वत:ला नाम फाऊंडेशनचा समन्वयक म्हणून घेत असली तरी फाऊंडेशनने तसे कोणालाही समन्वयक म्हणून नेमलेले नसल्याचे अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी म्हटले आहे. फाऊंडेशनतर्फे संबंधित कुटुंबीयांची कागदपत्रे संकलित करण्यासाठी राजाभाऊ शेळके व चंद्रकांत मोरे काम पाहात आहे. त्यामुळे नागरिकांनी शेळके व मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अनासपुरे यांनी केले.