महापालिकेचे नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित

महापालिकेमार्फत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व परवानग्या देण्यात येतात. त्याकरीता विविध विभागात जाऊन या परवानग्या व दाखले प्राप्त करावे लागतात. त्यात होणारा कालापव्यय टाळण्यासाठी सर्व परवानग्या व दाखले एकाच ठिकाणी प्राप्त होण्यासाठी महापालिकेने नागरी सुविधा केंद्राची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्या अंतर्गत एकूण ४५ सेवांचे संगणकीकरण करण्यात आले. या नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पालिकेच्या मुख्यालयात करण्यात आला. या केंद्रामार्फत ४५ दाखले व परवानग्या मिळविण्याची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. शिवाय, आपण सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधा मिळणार आहे.

यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आयुक्त अभिषेक कृष्णा तसेच गटनेते विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात १६ नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित होणार आहेत. त्यात महापालिका मुख्यालय, सहा विभागीय कार्यालये आणि नऊ उप कार्यालयांचा अंतर्भाव आहे. पालिका मुख्यालय व विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित झाले असून पुढील दोन दिवसात उपकार्यालयातील नऊ केंद्र कार्यान्वित होणार आहे.

या केंद्रात जवळपास ४५ सेवा पुरविण्यात येणार असून त्यात येस बँकेचे सहकार्य मिळाले आहे. या बँकेने नागरी सुविधा केंद्र चालविण्यासाठी मोफत मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे.  या केंद्रात बँकेद्वारे रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेने डेबीट कार्ड व क्रेडीट कार्डद्वारे कर भरणा करण्यासाठी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक पीओएस यंत्रही उपलब्ध करून दिले आहे.

पहिल्या टप्प्यात १६ ठिकाणी नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित केले जात असून पुढील पंधरवडय़ात आणखी सहा ठिकाणी असे एकूण २२ ठिकाणी ही केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नागरी सुविधा केंद्र प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असून ही योग्य पध्दतीने कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात त्यांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

केंद्रासह ऑनलाईनही व्यवस्था

नागरी सुविधा केंद्रात एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले व परवानग्या उपलब्ध होतील. या केंद्राबरोबर या सेवा नागरिकांसाठी ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरता येईल तसेच विविध दाखले व परवानग्यांसाठी आवश्यक शुल्कही भरता येईल. नागरी सुविधा केंद्रात प्राप्त होणारे सर्व अर्ज यांची विहीत कालावधीत कार्यवाही करुन वेळेत दाखले व परवानग्या देण्यात येतील. ही केंद्रे त्या-त्या विभागातील विभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करतील. या केंद्रात एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले व परवानग्या मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांना सादर केलेल्या अर्ज व परवानगीची सद्यस्थिती पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.