News Flash

चारसदस्यीय प्रभाग निश्चित

महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर

महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत ३१ पैकी २९ प्रभाग चारसदस्यीय तर दोन प्रभाग हे तीनसदस्यीय राहणार असल्याचे प्रारूप प्रभाग रचना आराखडय़ावरून स्पष्ट झाले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात  ४३ ते ५३ हजार इतकी मतदार संख्या राहणार आहे. महापालिका आयुक्तांनी निर्मिलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर विभागीय महसूल आयुक्तांच्या समितीने शिक्कामोर्तब केले. हा आराखडा सोमवारी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला.

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे. ही निवडणूक द्विसदस्यीय ऐवजी चार सदस्यीय पद्धतीने होणार आहे. या पाश्र्वभूमीवर, निवडणूक आयोगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडत व सुनावणी यासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला होता. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने पालिका आयुक्तांच्या आराखडय़ावर शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतची माहिती पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रारूप प्रभाग तयार करताना निवडणूक आयोगाने दिलेल्या प्राधान्यक्रमांचा कटाक्षाने विचार करण्यात आला. त्यात प्रगणक गटाच्या सीमारेषा, नैसर्गिक सीमारेषा यांचा समावेश आहे. जुन्या प्रभागांच्या सीमारेषा विस्कळीत होऊ नये याचाही विचार झाला असला तरी काही बाबतीत ते कायम ठेवणे अशक्य ठरले. आगामी निवडणुकीत ३१ प्रभाग आणि १२२ सदस्य राहणार आहेत. त्यातील २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार सदस्य तर दोन प्रभाग तीनसदस्यीय राहतील. लोकसंख्येच्या अंदाजानुसार प्रारूप आराखडा तयार केला गेला आहे. गावठाण भागात प्रभाग लहान तर शहराच्या बाह्य भागात ते मोठय़ा आकाराचे असतील. प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर झाला आहे. पुढील महिन्यात आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

मतदार नोंदणीसाठी ६१ प्रभागात केंद्र

निवडणूक आयोगाने १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत विधानसभा मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने मतदार नोंदणीसाठी खास मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर प्रसिद्ध धावपटू कविता राऊत हिची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत युवा अर्थात नवमतदारांच्या जागृतीकडे लक्ष दिले जाईल. गणेशोत्सवात मंडळांच्या सहकार्याने जनजागृती, मतदार जागृतीसाठी चित्ररथ, शहर बस वाहतुकीच्या बसमध्ये ध्वनिचित्रफितीद्वारे प्रचार, बचत गट सदस्यांमध्ये जनजागृती, महाविद्यालयांत विशेष कार्यक्रमांचे आयोजन, समाजमाध्यमांचा वापर, महापालिका नाटय़गृहात ध्वनिफीत व फलक या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकास मतदानाचा हक्क प्राप्त होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मतदार नोंदणी केली जात नाही. १ जानेवारी २०१७ रोजी विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघाची यादी महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी म्हणून वापरली जाते. या पाश्र्वभूमीवर, मतदार नोंदणीसाठी ६१ प्रभागात केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे कृष्णा यांनी सांगितले. कविता राऊत मतदार नोंदणी अभियानापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत विविध उपक्रमांत सहभागी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 12:39 am

Web Title: nagpur municipal corporation blue print submit to the election commission
Next Stories
1 पंचवटीतील तिहेरी अपघातात युवकाचा मृत्यू
2 ‘ओबीसी, बलुतेदारांनाही ‘अॅट्रॉसिटी’ चे संरक्षण मिळावे’
3 पीओपी मूर्तीचेही ‘पर्यावरणस्नेही’ विसर्जन
Just Now!
X