उमेदवारांच्या नावासह मनसेची भूमिकाही अनिश्चित

फोडाफोडीचे राजकारण आणि राज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचा प्रयोग महापालिकेत यशस्वी होतो की नाही, याची स्पष्टता शुक्रवारी रंगतदार बनलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणार आहे. पालिकेवरील सत्ता अबाधित राखण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली असून फुटीर नगरसेवकांना स्वगृही आणण्यासोबत विरोधकांना आपलेसे करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. राज ठाकरे यांनी नगरसेवकांशी चर्चा करूनही मनसेची भूमिका गुलदस्त्यात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत सेना, भाजपने आपल्या उमेदवारांची निश्चिती केली नव्हती.

फोडाफोडीचा इतका धसका भाजप अन् विरोधी शिवसेनेने घेतला की, आपापल्या नगरसेवकांना मतदान होईपर्यंत ते मोकळे ठेवणार नसून संबंधितांना मतदानासाठी थेट सभागृहात नेले जाणार आहे. त्यामुळे पक्षादेश बजाविण्यास अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात होणार आहे. महापौरपदासाठी ११, तर उपमहापौर पदासाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. महापौरपद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची संख्याही कमालीची विस्तारली असून आठ नगरसेवक फुटल्याने सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. सेना विरोधकांची मोट बांधून भाजपला पायउतार करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपकडून पाच, तर सेनेकडून चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवार निश्चितीवरून पक्षांतर्गत तीव्र स्पर्धा असल्याने हा घोळ उशिरापर्यंत मिटला नाही. ऐनवेळी नाव जाहीर करून पक्षांतर्गत नाराजी टाळण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.

महापौर पदासाठी भाजपकडून सतीश कुलकर्णी, दिनकर आढाव, शशिकांत जाधव, भिकूबाई बागूल, गणेश गिते यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर यांनी, तर भाजपच्या फुटीर गटातील कमलेश बोडके यांनी उघड बंडखोरी करत अर्ज दाखल केला. काँग्रेसचे राहुल दिवे यांचाही अर्ज आहे.

भाजपमधून दुरावलेल्या सानप गटाचे समर्थक बोडके यांच्यासह सुनिता पिंगळे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर पदासाठी भाजपचे गणेश गिते, अरूण पवार, अलका अहिरे, भिकूबाई बागूल यांनी तर शिवसेनेच्या विलास शिंदे, काँग्रेसकडून शाहु खैरे, डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीकडून सुफी जीन यांचे अर्ज आहेत. सेनेकडून महाआघाडी आकारास येण्याचे दावे केले जात असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याविषयी जाहीररित्या कोणतीही घोषणा झालेली नाही. उमेदवाराचे नांव ऐनवेळी जाहीर केले जाणार असल्याने सभागृहात माघारीच्या मुदतीत अर्ज मागे घेतला जाईल.

महाआघाडीत उपमहापौर पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही आग्रही आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामुळे पाच सदस्य असलेल्या मनसेला महत्व प्राप्त झाले आहे. मनसेच्या नगरसेवकांशी मुंबईत राज ठाकरे यांनी चर्चा केली. मनसे कोणाला साथ देणार हे ऐनवेळी जाहीर केले जाईल, असे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सेनेसोबतच मनसे राहणार असल्याचा दावा केला आहे. भाजपमधून फुटलेल्या सानप समर्थक नगरसेवकांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

फाटाफूट टाळण्यासाठी

नव्याने फाटाफूट होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे. सहलीला गेलेले भाजपचे नगरसेवक गोव्याहून नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. रात्री नाशिक लगतच्या एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवले जाईल. महापौर निवडणुकीच्या मतदानासाठी संबंधितांना थेट सभागृहात नेले जाणार असल्याचे भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले. शिवसेनादेखील अशी खबरदारी घेत आहे. मुंबईला गेलेले सेनेचे नगरसेवक रात्री शहरात परततील. त्यांनाही हॉटेलमध्ये ठेवण्याचे नियोजन केले जात असल्याचे चौधरी यांनी सांगितले. सेना, भाजप आपल्या नगरसेवकांना पक्षादेश बजावणार आहे. भाजपमधून फुटलेल्या सानप समर्थकांना महाआघाडीत काय स्थान मिळणार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समाधान कसे केले जाते, यावर बरेच काही अवलंबून आहे.