सर्व काही सरकारवर सोपविण्याच्या वृत्तीवर टीका

रस्त्यावरील  खड्डय़ांवरील चर्चा करणे, त्या विषयावर आंदोलन छेडणे किंवा अन्य मार्गाने त्याविषयी निषेध नोंदविणे यापेक्षा तो खड्डा कसा बुजवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. कारण उद्या याच खडय़ामुळे माझा किंवा माझ्या जवळच्या कोणाचा तरी अपघात होऊ शकतो. सर्व काही सरकारवर सोपविण्यापेक्षा आपणही काही केलेले बरे, असा टोला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या शैलीत लगावला.

आपला माणूस या चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व कार्यक्रमासाठी नाना पाटेकर हे नाशिकला आले होते. यावेळी पत्रकारांशी गप्पा मारतांना पाटेकर यांनी चित्रपटासह विविध विषयांवर विचार मांडले. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व खड्डे बुजविण्याची घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादीने ‘खड्डे विथ सेल्फी’ हे आंदोलन सुरू केले. सामान्य नागरिक म्हणून मला सेल्फी काढून आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा तो खड्डा बुजवायला आवडेल. कोणी काय करावे हा ज्याच्या त्याचा प्रश्न, असे  पाटेकर यांनी सांगितले. सध्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. नोकरी नाही याविषयी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा आपले कौशल्य वापरत स्वतचा व्यवसाय, उद्योग करता येतो का, याची चाचपणी करायला हवी. किती दिवस यात अडकून पडायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सध्या विविध माध्यमातून जातीयवादावर विचार व्यक्त होत असतांना राजकीय अस्तित्वासाठी जातीचे भांडवल कोण करीत आहे, याचा विचार आपण करायला हवा. याआधीही जात होती. मग अचानक हे का बिनसले, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतला विचारायला हवा. जाती धर्म सोडून माणूस म्हणून जगायला शिका. आपल्यातला माणूस हरवत चालला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  यावेळी ‘आपला माणूस’चे दिग्दर्शक सतीश राजवाडे, निखील साने आदी उपस्थित होते.