नांदगाव नगरपालिका

नांदगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. मतदानाला ३८ दिवस बाकी आहेत. यामुळे उमेदवारी मिळविण्यापासून ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यापर्यंत सर्व काही धावण्याच्या शर्यतीप्रमाणे पार पाडावे लागणार आहे. अलीकडेच झालेली पक्षांतरे, भुजबळांमागील शुक्लकाष्ठ न संपल्याने राष्ट्रवादीच्या गोटातील अस्वस्थता, युती होईल की नाही याविषयी संभ्रम.. अशा पाश्र्वभूमीवर होणारी नांदगाव नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही.

निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुका जाहीर केल्या. त्याचे वेळापत्रकही आले. आचारसंहिता लागली. आता इच्छुकांना वेध लागले आहेत उमेदवारीचे. राजकीय पक्षांच्या बैठकाही सुरू आहेत. मात्र ‘रात्र थोडी, सोंगे फार’ अशी इच्छुकांची अवस्था आहे. कारण प्रचाराला मिळणारा अतिशय कमी कालावधी. उमेदवारी मिळविणे, मतदारांच्या गाठीभेटी व प्रचार सारे काही एका दमात त्यांना पार पाडावे लागेल. नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने घेतल्या आहेत. मुलाखत देणाऱ्यांनी आपले तिकीट पक्के हे मानून प्रचारास सुरुवातही केली आहे.

मागील निवडणुकीत नगरपालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. १७ पैकी १४ जागा त्यांना मिळाल्या होत्या. काँग्रेसचे दोन तर शिवसेनेचा एक सदस्य असे पक्षीय बलाबल होते. मात्र या वेळी चित्र काहीसे पालटले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे व काँग्रेसचे नगरसेवक यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. छगन भुजबळ कारागृहात असल्याने राष्ट्रवादीवर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने उमेदवारी देताना सामाजिक बांधिलकी, लोकप्रियता तसेच कामांचा विचार याची काळजी प्रत्येक पक्षाकडून घेतली जाईल. कारण त्या उमेदवारावर त्या पक्षातील इतर उमेदवारांची भिस्त राहील.

सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होईल की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. युती झाल्यास आणखी वेगळे चित्र दिसेल. उमेदवारांची नावे दोन-तीन दिवसांत जाहीर होतील. निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार असेल हे निश्चित.

प्रश्न

निवडणुकीत पाणीप्रश्न महत्त्वाचा मुद्दा असेल. आजही शहराला २० ते २२ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. सर्वाधिक धरण असलेला तालुका म्हणून नांदगावची ओळख. मात्र नियोजनाअभावी शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. राष्ट्रवादीला हा प्रश्न सोडविण्यात अपयश आले.

  • एकूण प्रभाग – ८
  • जागा – १७
  • नगराध्यक्ष आरक्षण – ओबीसी संवर्ग