नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचा मुक्काम कायम आहे. मंगळवारी झालेल्या गणनेत अभयारण्य परिसरात ३४ हजार ४२४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्य़ातील थंडी तसेच पाण्याच्या मुबलकतेमुळे देशी-विदेशी पक्ष्यांचा मुक्काम अभयारण्य परिसरात कायम आहे. मंगळवारी वन अधिकारी, कर्मचारी, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्या सहकार्याने चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कुरुडगाव, काथरगाव या पाच ठिकाणी केलेल्या पक्षीनिरीक्षणात विविध पाणपक्षी आणि झाडावरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

यामध्ये २६ हजार ७०२ पाणपक्षी, सात हजार ७२२ झाडांवरील, गवताळ भागातील याप्रमाणे एकूण ३४ हजार ४२४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात कापशी बदक, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, गढवाल, ब्राह्मणी बदक, कॉमन पोचार्ड, विजन, लिटल क्रेक, बॅलन्स क्रेक, स्पूनबिल, रिव्हर टर्न, नकटा बदक, पोचार्ड, प्रॅटिन्कोल, कमळपक्षी, शेकाटय़ा, कॉमन क्रेन आदी पक्षी आढळून आले आहेत.

साहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वन परिमंडळ अधिकारी अशोक काळे, पक्षीमित्र दत्ता उगावकर, प्रा. आनंद बोरा आदी पक्षी गणनेत सहभागी झाले होते.