29 May 2020

News Flash

मोदींना पाहण्यासाठी आलोय..

पाच वर्षांच्या चिमुकल्यापासून वयोवृध्दांनीही आपण ‘मोदींना पाहण्यासाठी आलोय’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

उपस्थित गर्दीची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी जनतेचा कौल आजमावण्यासाठी सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी ही गर्दी जमली होती. अगदी पाच वर्षांच्या चिमुकल्यापासून वयोवृध्दांनीही आपण ‘मोदींना पाहण्यासाठी आलोय’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पंचवटी परिसरातील तपोवनातील मैदानावर पंतप्रधानांची जाहीर सभा झाली. सभेला पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, दिंडोरी आदी ठिकाणाहून नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे आले. या गर्दीत महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. प्रत्येकाची मोदींना पाहायचे आणि ऐकायचे ही एकच इच्छा. पेठहून आलेले मुरलीधर जाधव यांनी गावातून ५० पेक्षा अधिक जण गाडीने आल्याचे सांगितले. आम्हांला मोदींना जवळून पहायचे, पण आमच्याकडे पास नाही म्हणून पोलिसांनी आम्हांला जवळच्या बैठकीपर्यंत जाऊ दिले नाही. हा पास कुठे मिळतो, कोण देतो अशी विचारणा त्यांनी केली. आता मागे बसून मोठय़ा पडद्यावर मोदींना पहावे लागेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गंगानाथ झा हे मोदींच्या सभेसाठी मखमलाबादहून पायी ‘हर हर मोदी’ चा नारा देत आले. उत्तर भारतीय असलो तरी मोदींविषयी खूप आत्मीयता आहे. मोदींचे हिंदू धर्मविषयक विचार प्रेरणा देतात. माझ्या मुलीवर अन्याय झाला. त्याची दाद मोदींकडे मागावी एवढय़ासाठी सभेत आलो असल्याचे झा यांनी सांगितले. नागचौक येथील कुसुम देवाडीकर यांनी गल्लीतील काही महिलांसोबत आपण सभा स्थळापर्यंत पायी आल्याचे मांडले. सभेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रिक्षावाले अव्वाचे सव्वा पैसे मागतात. त्यामुळे पायी येण्याचा पर्याय निवडला. मोदींना पहायचे एवढीच इच्छा त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ नागरिक आव्हाड यांनी आपणास मोदींचे रोखठोक  विचार आवडतात, असे नमूद केले. मोदींच्या वेगवेगळ्या निर्णयांवर आमचे आमच्या कट्टय़ावर वाद होतात. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आज ते काय बोलतात हे घरी बसून टीव्हीवर पाहण्यापेक्षा आम्ही मित्रांनी थेट सभास्थळ गाठणे पसंत केल्याचे मांडले. गर्दीत आई-बाबांचा हात धरलेले काही चिमुकलेही होते. सभा सुरू होण्यासाठी होणारा विलंब पाहता आई-बाबांना मोदी कधी येणार, हा प्रश्न विचारून त्यांनी भंडावून सोडले. देव बायसने मोदींना पाहण्यासाठी आपण आज शाळेला बुट्टी मारल्याचे सांगितले. ज्यांना पंतप्रधान म्हणून टीव्हीवर पाहतो ते नाशिकला येणार हे कळल्यावर बाबांना म्हटलं मला सभेला जायचे. आज बुडालेला अभ्यास पूर्ण करता येईल, पण मोदींना पुन्हा असं भेटता येणार नाही, असा युक्तीवाद त्याने केला. महाविद्यालयीन विद्यार्थी श्याम गुजरने काही कार्यकर्त्यांकडून व्हीआयपी पास मिळाल्याने महाविद्यालयास दांडी मारून या ठिकाणची गर्दी, राजकीय सभा कशी असते,प्रत्येक वक्ता कसा बोलतो, मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतलेले असल्याने महाजनादेश यात्रेत या दत्तक शहराच्या विकासाविषयी, युवकांसाठी कुठल्या योजनांवर बोलतात, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आल्याचे नमूद केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:57 am

Web Title: narendra modi devendra fadnavis akp 94
Next Stories
1 सभास्थानी ‘इव्हीएम’ विषयी जनप्रबोधन
2 सोनसाखळी चोरीचे प्रकार सुरुच
3 बंदोबस्त, उत्साह आणि घोषणाबाजी..
Just Now!
X