सभेला येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ निश्चित

भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने होणार आहे. पंचवटीतील तपोवन येथे होणाऱ्या या सभेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. सभेसाठी येणाऱ्यांकरिता वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले -श्रींगी यांनी या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

वणी-दिंडोरी रस्ता आणि पेठ रस्त्याने सभेसाठी येणारी वाहने निलगिरी बाग येथे उभी करावी लागतील. तिथे पोहोचण्यासाठी आरटीओ सिग्नल-दिंडोरी रस्ता-रासबिहारी चौफुलीमार्गे मुंबई-आग्रा रस्ता ओलांडून निलगिरी बागेकडे जाता येईल. मुंबईकडून अर्थात इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, मोखाडा, अंबड, सिडको, भद्रकाली या भागांतून येणारी वाहने मुंबई-आग्रा रस्त्याने जुना मुंबईनाका-द्वारका चौक-टाकळी फाटामार्गे जुना सायखेडा रस्त्याने काशीमाळी मंगल कार्यालयापासून गोदावरी घाट येथे उभी केली जातील.

नाशिकरोड, पुण्याकडून येणारी वाहने बिटको सिग्नलवरून उजव्या बाजूला वळण घेऊन जेलरोडने दसक, नांदुरनाका सिग्नल येथून औरंगाबाद रस्त्यावरील मिरची ढाबा सिग्नलपासून जेजूरकर मळ्यासमोरील मोकळ्या जागेत उभी केली जातील. औरंगाबादकडून येणारी वाहने जनार्दन मठाजवळ इंद्रायणी लॉन्ससमोर उभी केली जातील. मालेगाव,ओझर, धुळ्याकडून येणारी वाहने रासबिहारी शाळा, बळी मंदिराजवळ डावीकडे वळून डाळिंब मार्केट या ठिकाणी उभी केली जातील.

मुंबई-आग्रा रस्त्याने धुळे, मालेगावकडून येणाऱ्या लहान वाहनांना उड्डाण पुलावरून मुंबईकडे जाता येईल. मुंबईकडून येणाऱ्या लहान वाहनांना धुळ्याकडे जाताना पुलाखालून न जाता द्वारका रॅम्पवरून के. के. वाघ महाविद्यालयाजवळ उतरून पुढे मार्गस्थ होता येईल. मुंबईकडून औरंगाबादकडे जाणारी वाहने द्वारका-बिटको चौक-जेल रोड-नांदुरनाकामार्गे जातील.

नाशिक शहरातून येणारी काही वाहने काटय़ा मारुतीकडून उजव्या बाजूने टकलेनगर, कृष्णानगर, तपोवन रस्त्याने तसेच लक्ष्मी नारायण लॉन्ससमोरून चौफुली ओलांडून तपोवन रस्त्याने कपिला संगमच्या पुढे जातील. त्या ठिकाणी वाहने उभी केली जातील. शहरातील दुचाकी या लक्ष्मी नारायण मंदिरासमोरून तपोवन रस्त्याने उजव्या बाजूला बटुक हनुमान येथील मोकळ्या जागेत उभ्या केल्या जातील.  लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने साधूग्रामजवळील कमानीच्या उजव्या बाजूकडील मोकळ्या जागेत उभ्या केल्या जातील. सभेसाठी येणाऱ्या आणि इतरत्र जाणाऱ्या नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी पाच या कालावधीत उपरोक्त मार्गानुसार वाहतूक मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी केले आहे.