दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीग जमात परिषदेहून परतलेले तसेच त्याबाबतची माहिती लपविणाऱ्यांचा शोध नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात घेण्यात येत असून त्यापैकी नाशिक जिल्ह्य़ात मिळालेल्या २६ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्य़ातून या परिषदेस ३२ जण गेले होते. या सर्वाचा शोध पोलीस व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

तबलीग समाजाच्या निजामुद्द्ीन येथील परिषदेत विदेशातूनही काही जण उपस्थित होते. त्यांनी निजामुद्दीनमधील तबलीग मरकजला भेट दिली. या ठिकाणी जमलेल्या काही जणांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनासह आरोग्य विभागाची धावपळ उडाली. नाशिक जिल्ह्य़ातून ३२ जण परिषदेला गेले होते.

जिल्हा प्रशासनाकडे केंद्र सरकारकडून आलेल्या यादीनुसार मालेगाव, निफाड, सिन्नर येथील १० जणांपर्यंत जिल्हा पोलीस पोहचले. याशिवाय यंत्रणेच्या माध्यमातून अजून माहिती संकलित करण्यात येत आहे. १० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करत त्यांना घरीच १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.

नाशिक शहरातून परिषदेला गेलेल्या २२जणांचाही शोध घेण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील सर्वच्या सर्व ३२ जणांचा शोध घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. संबंधितांची महापालिकेच्या वतीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. १६ जणांना त्यांच्या घरीच महापालिकेने विलगीकरणात ठेवले आहे.

जळगावमध्येही शोध सुरू

जळगाव जिल्ह्य़ातूनही तबलीग जमात परिषदेला गेलेले काही जण कुठलीही तपासणी न करता परतले आहेत. त्याबाबतची माहिती नागरिक लपवत असल्याचे प्रशासनाला समजल्यावर जिल्ह्य़ात अशा नागरिकांचा शोध घेत चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दिले. संबंधित नागरिकांचा शोध घेत त्यांची आरोग्य तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. धुळे आणि नंदुरबार येथे अद्याप प्रशासनाकडून याबाबत कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही.

करोनाचे दोन संशयित रूग्णालयात

नाशिक शहर परिसरात करोना सदृश्य लक्षणे असलेली दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. विशेष म्हणजे त्यांचा विदेशवारीचा इतिहास नाही. इगतपुरी येथील गरोदर मातेला अचानक दम लागणे-खोकल्याचा त्रास झाला. तर सातपूर येथील १२ वर्षांच्या मुलाला दम लागणे, ताप आणि खोकला सुरू झाला. या दोघांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, लासलगाव परिसरातील करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात असलेल्या १५ संशयितांचा अहवाल नकारात्मक आला आहे.