शाळांचे शिक्षक सेवाकुंज चौकात
अतिशय वर्दळीच्या आणि कोणतेही नियोजन नसलेल्या पंचवटीतील सेवाकुंज चौकात बसच्या धडकेत तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गुरूवारी परिसरातील शाळेचे शिक्षकच रस्त्यावर उतरले. श्रीराम व नवभारत विद्यालयातील चार ते पाच शिक्षकांनी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी हजर राहून विद्याथ्र्र्याना रस्ता ओलांडण्यास मदत केली. अपघातात मयत झालेला रोनित अश्विन चौहान ज्या शाळेत शिक्षण घेत होता, त्या आर. पी. विद्यालयास या दिवशी सुटी देण्यात आली. या अपघातामुळे समस्त पालक आणि विद्यार्थी सर्द आणि तितकेच संतप्त झाले असताना आजवर गाढ झोपेत राहिलेल्या वाहतूक पोलिसांना जाग आली. या चौकात कर्मचारी नियुक्त करण्यात आला. तथापि, अनेक प्रमुख रस्ते आणि मध्यवर्ती भागात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आजही जीव कोंडीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याकडे ही यंत्रणा कधी लक्ष देणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
पंचवटीतील निमाणी बसस्थानक-जुना आडगाव नाका या दरम्यानच्या रस्त्यावर बुधवारी सकाळी बस खाली सापडून आर. पी. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रोनितचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या समवेत असणारी आजी संगीता चौहान गंभीर जखमी झाली तर बहिण देविका ही दूरवर फेकली गेली. या परिसरात वाहनांची कमालीची वर्दळ असते. शहर बस वाहतुकीच्या बसगाडय़ांबरोबर भाजीपाला वाहणारी वाहने, महामार्गाकडे जाणारी वाहने आणि दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. यामुळे सेवाकुंज चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. तथापि, वाहतूक पोलिसांना त्याचे गांभीर्य हा अपघात घडेपर्यंत लक्षात आले नाही. आजवर इतर काही भागात असे अपघात होऊन विद्यार्थ्यांंना प्राण गमवावे लागले आहेत. तात्पुरती मलमपट्टी ही या विभागासह महापालिकेची कार्यशैली राहिली. या अपघाताने समस्त पालक वर्गात रस्त्यावर मार्गक्रमण करताना आपला पाल्य सुरक्षित राहील की नाही, याबद्दल भीती निर्माण झाली आहे.
अपघातात चिमुकल्या रोनितचा मृत्यू झाल्यामुळे आर. पी. विद्यालयाने गुरूवारी शाळेला सुटी दिली. या शाळेलगत नवभारत आणि श्रीराम विद्यालय आहे. या शाळेतील चार ते पाच शिक्षक शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत चौकात दाखल झाले. पालकांनी पाल्यांची ने-आण करण्यासाठी गर्दी केली. वाहतूक पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही पोलीस व उपाययोजना केल्या जात नसल्याने याआधी त्यांना या पध्दतीने चौकात यावे लागत होते, असेही शाळेकडून सांगण्यात आले. रस्ता ओलांडण्यास शिक्षकांनी मदत केली. सर्व विद्यार्थी जाईपर्यंत संबंधित या ठिकाणी उपस्थित राहिले. आजवर झोपेत राहिलेल्या वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी कर्मचारी तैनात केला.
रविवार कारंजा, सीबीएससह अनेक भागात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची एकच गर्दी उसळलेली असते. मात्र, अशा ठिकाणांकडे वाहतूक पोलिसांनी कधी लक्ष दिले नसल्याचा अनुभव आहे. महापालिकेची कार्यशैली या विषयाशी आपला कोणताही संबंध नसल्यासारखी आहे. वास्तविक, मुंबई व पुणे सारख्या शहरांमध्ये महापालिकेत वाहतूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत वाहतूक पोलीस व महापालिका अपघात रोखण्यासाठी समन्वयाने काम करतात. पालिकेचे सत्ताधारी व प्रशासन नाशिकला ‘स्मार्ट’ बनविण्याचा प्रयत्न करत असले तरी वाहतुकीशी संबंधित मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे त्यांच्यामार्फत सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते, अशी पालकांची तक्रार आहे.