News Flash

नाशिकमध्ये आदर्श विद्यालय सिडकोकडून जमीनदोस्त

महाराणा प्रताप चौकात एका भूखंडावर १९८४ पासून आदर्श विद्यालय ही शाळा आहे.

महाराणा प्रताप चौकातील खासगी भूखंडावर उभारलेल्या आदर्श विद्यालयाचे बांधकाम सिडकोने अनधिकृत ठरवत सोमवारी जमीनदोस्त केले. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्यामुळे शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली, तर वारंवार पूर्वकल्पना देऊनही अतिक्रमण काढले जात नसल्याने अखेरीस ही कारवाई केल्याचे सिडकोने म्हटले आहे. शिक्षण संस्था आणि सिडको यांच्यातील वादात सुमारे ४०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी बनण्याच्या मार्गावर आहे.

महाराणा प्रताप चौकात एका भूखंडावर १९८४ पासून आदर्श विद्यालय ही शाळा आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात ३८६ विद्यार्थी शिक्षण घेतात. सोमवारी सकाळी सिडकोच्या प्रशासकीय अधिकारी कांचन बोधले यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. शाळा जमीनदोस्त होणार याची कल्पना आल्यावर संस्थाचालकांनी साहित्य काढण्यासाठी पुरेसा वेळ मागितला. तथापि, संस्थेचे काही म्हणणे ऐकून न घेता ही कारवाई केली गेल्याची तक्रार संस्थाचालक सुभाष कोठावदे यांनी केली. मागील तीस वर्षांपासून या जागेवर शाळा असून आजपर्यंत अतिक्रमणासंबंधी कोणतीही नोटीस दिली गेली नाही. शाळा जमीनदोस्त केल्यामुळे बाक व इतर साहित्याचे नुकसान झाले. १५ जून रोजी शाळा सुरू होणार आहे. तत्पूर्वीच, सर्व वर्गखोल्या पाडून टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे काय करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे संस्थाचालक व शिक्षकांनी म्हटले आहे. परंतु संस्थेचे सर्व आक्षेप सिडकोने फेटाळले. सिडकोच्या खासगी भूखंडावर हे अतिक्रमण करण्यात आले होते. चार वर्षांपासून संबंधितांना ते काढून घेण्याची सूचना दिली गेली. तथापि, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेरीस हे अतिक्रमण हटवण्यात आल्याचे बोधले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 2:05 am

Web Title: nashik adarsh school demolished by cidco
टॅग : Cidco
Next Stories
1 .. तर मंत्रालयावर कांदाफेक आंदोलन
2 सिडको परिसरात कुल्फीतून ५० जणांना विषबाधा
3 महाराष्ट्राच्या संघात नाशिकचे १५ नौकानयनपटू
Just Now!
X