‘गो एअर’चा वाहनतळ म्हणून ओझरचा विचार

प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या आणि अधूनमधून धुगधुगत राहणारा नाशिकला हवाई नकाशावर आणण्याचा प्रश्न नवीन वर्षांत कायमस्वरूपी सोडविण्यासाठी खासगी कंपन्यांऐवजी आता या क्षेत्रातील सरकारी आस्थापनांचा आधार घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. फेब्रुवारीपासून नाशिक-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू करण्याचे एअर इंडियाने मान्य केले आहे. दुसरीकडे ओझर विमानतळाचे संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने करावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. या क्षेत्रातील सरकारी आस्थापनांच्या मदतीने नाशिकच्या विमानतळाची प्रसिद्धी करण्यावर भर दिला जाणार आहे. याच जोडीला गो एअर या खासगी कंपनीने आपली विमाने रात्रीच्या वेळी ‘पार्किंग’साठी अहमदाबादऐवजी ओझर विमानतळावर आणण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.

धार्मिक तीर्थक्षेत्राबरोबर औद्योगिक व कृषी उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या नाशिकला हवाई नकाशावर आणण्याचे दशकभरात झालेले प्रयत्न वेगवेगळ्या कारणांस्तव अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. सुवर्ण त्रिकोणातील एक कोन असणाऱ्या नाशिकच्या विमानतळ उभारणीसाठी राज्य शासनाने तब्बल ८० कोटींचे द्रव्य खर्च केले. या विमानतळाचे दोन वर्षांपूर्वी थाटामाटात उद्घाटन झाले, परंतु कायमस्वरूपी विमानसेवा सुरू होण्याचे स्वप्न काही प्रत्यक्षात येऊ शकलेले नाही. काही महिन्यांपूर्वी छोटेखानी विमानांच्या माध्यमातून नाशिक-पुणे आणि नाशिक -मुंबई अशा हवाई सेवा सुरू करण्याचा प्रयत्न मेहेर एअर सव्‍‌र्हिसेस आणि श्रीनिवास एअरलाइन्स या खासगी कंपन्यांनी केला. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद न लाभल्याने त्या गुंडाळणे भाग पडले. परिणामी, कोटय़वधी खर्चून उभारलेल्या ओझर विमानतळाचा वापर नियमितपणे होऊ शकलेला नाही. गतवर्षी खासगी कंपन्यांच्या सर्वेक्षणात नाशिक-मुंबई अथवा नाशिक-पुणे विमानसेवेला फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याने त्यांनी रुची दाखविली नसल्याचे स्पष्ट झाले. छोटेखानी विमानांचा प्रयोगही फलद्रूप झाला नाही. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘एअर इंडिया’ नाशिकच्या मदतीला धावून आली आहे. या कंपनीने फेब्रुवारीपासून नाशिक-मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचे मान्य केले आहे. त्याबाबतचे पत्र कंपनीने आपणास दिले असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले. सरकारी विमान कंपनीने पुढाकार घेतल्यामुळे खासगी कंपनीसारखा अनुभव येणार नाही. देशातील प्रमुख शहरांना हवाईसेवा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या अंतर्गत ही विमानसेवा कार्यान्वित होत असल्याने त्यात काही अवरोध येणार नाही, असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला.

ओझर विमानतळाचे संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने करावे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. प्राधिकरणाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या विमानतळाची जबाबदारी प्राधिकरणाने स्वीकारल्यास या मुद्दय़ावरून चाललेला घोळ कायमस्वरूपी मिटू शकतो. विमानतळाचा वापर सुरू होण्यासाठी विमानांसाठी ‘पार्किंग’ सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रश्नाचे घोंगडे प्रदीर्घ काळापासून भिजत पडले आहे. मुंबईतील विमानतळावर ‘पार्किंग’साठी जागा नसल्याने रात्री बहुतांश विमाने अहमदाबाद विमानतळावर नेली जातात. ही विमाने ओझर विमानतळावर थांबविता येऊ शकतात. अहमदाबादच्या तुलनेत मुंबईहून नाशिकला विमान आणण्याचा इंधन खर्चही कमी आहे. त्यात विमान कंपन्यांची बचत होईल. मागील आठवडय़ात गो एअर कंपनीच्या व्यवस्थापनाला ही बाब पटवून देण्यात आली.

या कंपनीने आपली विमाने अहमदाबादला नेण्याऐवजी ओझरच्या विमानतळावर थांबविण्याचे मान्य केले आहे. ओझर विमानतळावर आठ प्रवासी विमाने थांबू शकतात इतकी जागा आहे. रात्रीच्या वेळी विमानांना उतरण्यासाठी आवश्यक ठरणारी ‘नाइट लँडिंग’ची सुविधा उपलब्ध आहे. या सर्वाचा हातभार विमानतळाचा वापर सुरू करण्यास लागणार आहे.