२५ जानेवारीपासून वाहतुकीला सुरुवात

लोकसत्ता प्रतिनिधी , नाशिक : हैद्राबाद, दिल्ली, पुणे, अहमदाबाद या शहरांना हवाईमार्गे जोडल्यानंतर नववर्षांत नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार असल्याने नाशिक विमानतळाचा देशातील इतर विमानतळांशी असणारा प्रवासी संपर्क अधिकच वाढणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून बेळगावसाठी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. कें द्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत २५ जानेवारीपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे.

या विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि गोवा येथे जाणाऱ्या हौशी आणि धार्मिक पर्यटकांना मोठी मदत होणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. या विमानसेवेमुळे बेळगावहून रस्तामार्गे कोल्हापूर आणि गोव्याला अवघ्या दीड ते दोन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. उड्डाण योजनेंतर्गत नाशिक शहर देशभरातील मोठय़ा शहरांना जोडले जावेत यासाठी ही योजना सुरू झाल्यापासून खासदार गोडसे यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

काही महिन्यांपासून ओझर विमानतळावरून हैदराबाद, दिल्ली, पुणे, बेंगळूरु, अहमदाबाद या ठिकाणांसाठी विमानसेवा कार्यरत आहे.

नाशिक येथून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तसेच गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नाशिक-बेळगाव या दरम्यानची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी जिल्ह्य़ातून मागणी करण्यात येत होती.  याशिवाय बेळगाव येथे कलावती देवी यांचे मंदिर असल्याने त्या ठिकाणी होणाऱ्या विविध उत्सवांना उपस्थित राहणाऱ्यांसाठी या सेवेमुळे दिलासा मिळाला आहे. सध्या या भक्तांना कोल्हापूर आणि तेथून बेळगाव किं वा थेट बेळगाव बसने नाशिकहून जावे लागते. त्यासाठी १५ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. परंतु या विमानसेवेमुळे बेळगाव के वळ एक तासात गाठता येणार आहे. नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी साधारण २२०० किं वा २५०० रुपये तिकीट दर राहील. या विमानाची आसन क्षमता ५० असून  त्यापैकी २५ आसनांच्या तिकीटावर ५० टक्के  अनुदान राहणार आहे. म्हणजेच या तिकिटांचा दर कमी राहणार आहे.

आठवडय़ातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार असून यामध्ये सोमवार , शुकवार आणि रविवारचा समावेश आहे. बेळगाव येथून गोवा आणि कोल्हापूर रस्तामार्गे अवघ्या दीड ते दोन तासांचा प्रवास आहे.

आठवडय़ातून तीन दिवस नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू राहील. बेळगावहून दुपारी ४.४० मिनिटांनी विमान निघेल. ते नाशिक येथे सायंकाळी ५.४० मिनिटांना पोहोचणार आहे. त्यानंतर हे विमान नाशिकहून सायंकाळी सव्वासहा वाजता सुटेल. ते बेळगाव येथे सव्वासात वाजता पोहोचणार आहे.