वाहनांची तोडफोडप्रकरणी नगरसेविकेच्या पतीला अटक

इंदिरानगर परिसरात भाजपचे प्रभाग क्रमांक ३०चे नगरसेवक सतीश सोनवणे, नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याच्या प्रकरणात त्याच प्रभागातील भाजप नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे पती सुनील खोडे यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजीने हिंसक वळण घेतल्याचे दिसून येत आहे. संशयित खोडे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्र. ३० मध्ये श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी आणि सतीश सोनवणे हे चारही नगरसेवक भाजपचे आहेत. ५ एप्रिल रोजी डॉ. कुलकर्णी तसेच सोनवणे यांच्या वाहनांच्या काचा समाजकंटकाने फोडल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तेथील सीसीटीव्हींची तपासणी केली असता दोन्ही घटनांमध्ये दुचाकी वाहने आणि तरुण एकच असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित ओमकार मैंद (२३, रा. पांडवनगरी) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या घटनेचा मुख्य सूत्रधार प्रीतम ऊर्फ डॅनी गोडसे असल्याची माहिती मिळाल्यावर त्याचा शोध सुरू झाला. प्रीतम पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याची कसून चौकशी केली असता नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे पती सुनील खोडे यांच्या सांगण्यावरून वाहनांची तोडफोड केली असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी खोडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ते बाहेरगावी असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी सकाळी स्वत:हून ते इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर झाले.  वडाळा गावात झालेल्या घरकुल योजनेत नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. कुलकर्णी यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. घरकुल वाटप योजनेतही याची पुनरावृत्ती झाल्याने याचा राग मनात धरत वाहने तोडफोडीचे कृत्य केल्याची कबुली खोडे यांनी दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून जामिनावर मुक्तता केली. याप्रकरणी डॉ. कुलकर्णी आणि सोनवणे यांनी खोडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी तसेच पक्षांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

भाजप पदाधिकारी तटस्थ  

महापालिकेतील सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. दीपाली कुलकर्णी आणि सतीश सोनवणे यांची ओळख आहे. प्रभागातील स्वच्छता, पाणी प्रश्न, नागरिकांचे मनोरंजन, बचत गटातील महिलांना बाजारपेठ अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर डॉ. कुलकर्णी आणि सोनवणे ठोस भूमिका घेत वेळप्रसंगी पदरमोड करत उपक्रम हाती घेतात. यामध्ये पक्षातील पदाधिकारी किंवा अन्य नगरसेवकांना सोबत न घेता त्यांचे ‘एकला चालो रे’च्या भूमिकेतून काम सुरू असते. आपले प्रश्न सुटत असल्याने प्रभागातील नागरिकही वेळोवेळी त्यांच्याकडे धाव घेतात, परंतु त्यांची एकला चालो रेची भूमिका त्यांना नडली. वाहनांच्या तोडफोडीनंतर भाजपचा एकही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी दोघांची भेट घेतली नाही.