भाजप लोकप्रतिनिधींमध्ये कुरघोडीचे राजकारण

महापालिका हद्दीतील शेतजमीन, निवासी-अनिवासी तसेच औद्योगिक क्षेत्रावरील मिळकतीवर कर आकारणीच्या मुद्यांवर सत्ताधारी भाजप आमदारांच्या मुंबई वाऱ्या सुरू झाल्या आहेत. या प्रश्नावर आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप आणि आ. सीमा हिरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांची भेट घेतली. या विषयावरून भाजपच्या स्थानिक आमदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. करवाढीच्या प्रश्नावर पुढील आठवडय़ात पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिक येथे शेतकरी, शिक्षण संस्था चालक, औद्योगिक संघटना आदींशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर करवाढीसंदर्भात लोकाभिमुख निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

हरित क्षेत्रातील शेत जमिनी करातून वगळल्यानंतर पिवळ्या क्षेत्रातही कर लावू नये, यासाठी सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असताना दुसरीकडे मालमत्ता करवाढी विरोधात उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, व्यापारी, वकील आणि व्यावसायिक संघटित झाले आहेत. कर वाढीविरोधात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. करवाढीच्या विषयावर सत्ताधारी भाजपने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या छताखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. करवाढीचा निर्णय घेणाऱ्या आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची रणनीतीही आखली जात आहे. शहरवासीयांशी निगडीत या मुद्यावर सत्ताधारी भाजपमधील असमन्वय ठळकपणे समोर येऊ लागला आहे. कर वाढीच्या विरोधात कृती समितीतर्फे बैठकांचे सत्र सुरू असतांना त्या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष आ. सानप यांच्यासह आ. सीमा हिरे यांनी सहभाग नोंदवत शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले होते.

या बैठकांमध्ये सहभागी न झालेल्या भाजपच्या तिसऱ्या आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. पिवळ्या क्षेत्रातील शेत जमिनींवर कर आकारणी योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडताना इतर स्थानिक आमदार नव्हते. ही बाब प्रसारमाध्यमातून लक्षात आल्यावर दुसऱ्या दिवशी सानप आणि हिरे या आमदारांनी तातडीने मुंबई गाठून पुन्हा एकदा हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. तत्पूर्वी, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यात आली. करवाढीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या स्थितीविषयी अवगत करत निवेदन दिले. पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी उभय आमदारांचे म्हणणे जाणून घेतल्यावर लवकरच या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या बाबतची माहिती हिरे यांनी दिली.

पुढील आठवडय़ात पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकला येऊन शेतकरी बांधव, शिक्षण संस्था चालक, औद्योगिक संघटना आदींच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. मालमत्ता करवाढीच्या मुद्यावर पालिका प्रशासनाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे.

– आ. सीमा हिरे