अनुकंपा तत्वावर शिक्षिका म्हणून नोकरीचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे पाठविण्यासाठी १५ लाखाची लाच मागितल्या प्रकरणी चांदवडच्या चिंतामण शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षांचा मुलगा भूषण जयचंद कासलीवाल याच्यासह संस्थेचा सचिव या दोघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कासलीवाल हा चांदवडचा विद्यमान नगराध्यक्ष आहे.  तक्रारदारांचे पती या शिक्षण संस्थेच्या राजदेरवाडी आश्रमशाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. २०१२ मध्ये कर्तव्यावर असताना अपघातात त्यांचे निधन झाले. यामुळे तक्रारदाराने अनुकंपा तत्वावर शिक्षिका म्हणून सामावून घेण्याबाबत समाज कल्याण विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे व प्रस्ताव सादर करण्याचे आदेश चिंतामण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अर्चना कासलीवाल यांना देण्यात आले. तक्रारदार सप्टेंबर २०१५ मध्ये संस्थेत गेल्या असता अध्यक्षांचा मुलगा भूषण कासलीवाल आणि शिक्षण संस्थेचा सचिव वर्धमान पांडे यांनी नियुक्तीचा आदेश देण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने पडताळणी केली असता कासलीवाल व पांडेने नोकरीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी उपरोक्त रकमेची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीवरून जानेवारी महिन्यात सापळा रचण्यात आला. त्यावेळी सचिव पांडेने निवडणुकीचे कारण देऊन पैसे नंतर घेईल असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी सापळा कारवाईसाठी प्रयत्न केले असता कासलीवाल व पांडे यांनी तक्रारदारांना भेटण्यास टाळाटाळ केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. लाचेची मागणी केल्याचे पुरावे उपलब्ध झाल्यामुळे या विभागाने दोघांविरुध्द चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जैन धर्मियांच्या मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथे सुरू असणाऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे स्वागताध्यक्षपद भूषण कासलीवाल याच्याकडे आहे. या ठिकाणी भाजपच्या दिग्गज नेत्यांसमवेत तो वावरत होता. पक्षाच्या नगराध्यक्षाविरुध्द गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजपच्या वर्तुळातही अवस्थता पसरली आहे.