संस्थेचे उद्या ९९ व्या वर्षांत पदार्पण

राष्ट्रीय शिक्षण प्रसाराच्या हेतूने एक मे १९१८ रोजी स्थापन करण्यात आलेली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्था एक मे रोजी ९८ वा वर्धापन दिन साजरा करत असून यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ९९ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या संस्थेची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी संस्थेची प्रगती, संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांची माहिती दिली आहे. एक मे १९१८ रोजी शि. रा. कळवणकर, शि. अ. अध्यापक, रं. कृ. यार्दी, ल. पां. सोमण, वा. वि. पाराशरे यांनी एकत्र येऊन संस्थेची स्थापना केली. नाशिकमध्ये सुरूवातीला न्यू इंग्लिश स्कुल ही माध्यमिक शाळा अशोक स्तंभ परिसरात सुरू केली. हीच शाळा आता जु. स. रुंग्टा हायस्कुल म्हणून ओळखली जाते.

संस्थेचे मुख्य कार्यालयही येथेच आहे. सुरूवातीला खासगी शाळेतील शिक्षकांना सरकारच्या माध्यमातून वेतन दिले जात नव्हते. समाजातून दानशूर व्यक्तींकडून आर्थिक निधी जमा करून वेतन दिले जाई. त्या काळातील शिक्षकांनी पदरमोड करून ज्ञानदानाच्या माध्यमातून समाजसेवा केली. त्यामुळेच संस्थेचा विस्तार झाला.

सद्यस्थितीत नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव, मनमाड, सावरगांव, हिवरे आणि पिंपळद या ठिकाणी संस्थेच्या शाळा आहेत. संस्थेची आज दोन कला व वाणिज्य महाविद्यालये, नाशिक व सिन्नर येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तीन कनिष्ठ महाविद्यालये, १४ माध्यमिक शाळा, सात  प्राथमिक शाळा, सात पूर्वप्राथमिक शाळा तसेच एक इंग्रजी माध्यमची शाळा असा पसारा आहे.

याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र, एमबीए अभ्यासक्रम, एम. कॉम., स्पोकन इंग्लिश कोर्स, संगीत महाविद्यालय आदी अभ्यासक्रम संस्थेमार्फत चालविले जातात. संस्थेच्या शाळांमधून २० ते २२ हजार विद्यार्थी अध्ययन करतात. संस्थेचे सुमारे ५०० शिक्षक, १५० शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

संस्थेच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राविण्य वर्गाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी सी. व्ही. रमण टॅलेंट सर्च अकादमी, मराठी माध्यमाचा विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयामध्ये नैपूण्य मिळण्यासाठी संस्थेतर्फे ‘फंक्शनल इंग्लिश कोर्स’ सारखे अभ्यासक्रम, संगणकीय ज्ञानासाठी परीक्ष, संगणक छंद मंडळ स्पर्धा यासारखे विविध शैक्षणिक उपक्रम घेण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांचा विकास साधण्यासाठी संस्थेच्या संकुलांमध्ये ल. पा. सोमण, लक्ष्मीबाई लेले, गणेश बाबाजी काथे व रामचंद्र बाबाजी काथे यांच्या स्मृतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. नाटय़ गुणांना वाव देण्यासाठी वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा घेतली जाते.

उन्हाळी सुटय़ांमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी छंद वर्गाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती तसेच मूल्यांची जोपासना करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी भारत पूजन सोहळ्याचे आयोजन केले जाते. क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महोत्सव तसेच संस्थेमार्फत क्रीडा प्रबोधिनी नाशिक व नाशिकरोड संकुलांमध्ये चालविली जाते.

समाज प्रबोधनासाठी रं. कृ. यार्दी व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेत आतापर्यंत इतिहास तज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक सेतूमाधवराव पगडी, बिंदुमाधव जोशी, वि. वि. करमकर, प्रा. राम शेवाळकर, गो. नि. दांडेकर, माधव गडकरी, नारायण सुर्वे आदी मान्यवरांनी हजेरी लावली आहे. विद्यार्थ्यांमध्ये  व्यायामाची आवड निर्माण होण्याकरिता रथसप्तमीला सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात खंडेराव बळवंत लेले स्मृती सूर्यनमस्कार स्पर्धा व संस्थेच्या प्रत्येक शाळेत सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक घेतले जातात. कवी कुसुमाग्रज

तथा तात्यासाहेब शिरवाडकर, बापू नाडकर्णी हे संस्थेच्या जु. स. रुंग्टा हायस्कुलचे माजी विद्यार्थी आहेत. संस्थेने माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली असून यात एकूण १७ हजार माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे माजी अध्यक्ष काकासाहेब नाईक यांच्या प्रेरणेतून एक मे २००८ रोजी ‘ज्ञानयात्री’ है त्रमासिक संस्थेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले.

या वर्षी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘छोटा ज्ञानयात्री’ हे त्रमासिक सुरू करण्यात आले. संस्थेच्या नाशिक, नाशिकरोड संकुलात बालमंदिरांमध्ये खेळणी घर उभारली आहेत. पर्यावरण दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात येतात.

संस्थेच्या सर्व संकुलातून विज्ञान सर्कलचे आयोजन करण्यात येते. भविष्यातही संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, डॉ. सुनील कुटे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक प्रयत्नशील असल्याचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी नमूद केले.