हिंदू नववर्षांचे स्वागत करण्यासाठी शहर परिसरातून निघालेल्या स्वागतयात्रा.. त्यात पारंपरिक वेशभूषेत बालगोपालांसह सहभागी झालेले नागरिक.. कुठे लेझीम तर कुठे टाळ-मृदंग. तर काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरावर सहभागी झालेले ध्वज पथक.. अश्वारूढ रणरागिणी. कलशधारी महिला.. सामाजिक संदेश देणारे चित्ररथ.. यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या या सर्वानी अनोखे रंग भरले. अशा उत्साहपूर्ण वातावरणात साहित्य, सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून शुक्रवारी मराठी नववर्षांचे स्वागत अभूतपूर्व उत्साहात करण्यात आले.
गुढीपाडवा अन् नववर्ष स्वागतयात्रा हे समीकरण नाशिक शहर परिसरासह उत्तर महाराष्ट्रात रूढ होऊ लागले आहे. नाशिकमध्ये तर या दिवसाचा बाज काही वेगळाच असतो. मागील काही दिवसांपासून चाललेल्या तयारींचा आविष्कार या यात्रांमधून अधोरेखित झाला. अनेक भागांतील यात्रांचे कल्पकतेने नियोजन करण्यात आले. महापुरुषांची जयंती आणि नववर्ष याचे औचित्य साधत काढलेल्या महारांगोळीने समितीने कल्पकतेचा प्रत्यय दिला. भल्या पहाटेपासून निघालेल्या स्वागतयात्रांनी वातावरणाचा नूर बदलला. नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, कॉलेज रोड, लव्हाटे मळा यासह इंदिरानगर, सदिच्छानगर, राजीवनगर परिसर, चेतनानगर आणि सिडको या भागांतून नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आल्या.
शोभायात्रेत अश्वधारी झाशीची राणी, बाल शिवराय यांच्यासह राष्ट्रीय व्यक्तींच्या वेशभूषेत बालगोपाळ सहभागी झाले. गंगापूर रोड येथील स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आत्महत्या करू नका.. असा संदेश दिला. मध्यवर्ती भागात महिलांनी मंगळागौरीच्या गाण्यांवर ताल धरत विविध कसरती सादर केल्या. युवतींच्या काठय़ांच्या प्रात्यक्षिकांनी सर्वाचे लक्ष वेधले. यावर कडी केली ती ढोल-ताशांच्या गजरात लयबद्ध पद्धतीने चालणाऱ्या भगव्या ध्वज पथकाने. नरेंद्र महाराज यांच्या शिष्यांनी कलशयात्रा काढत नववर्ष स्वागतास वेगळा आयाम दिला. या सर्व घडामोडी भ्रमणध्वनीत कैद करण्यासाठी उपस्थितांची धडपड सुरू होती.
यात्रेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे भान जपण्यात आले. बेटी बचाव-बेटी पढाओ, स्वच्छता अभियान याबद्दल प्रबोधन करणारे चित्ररथ यात्रेत सहभागी करण्यात आले. काहींनी या विषयांवर आधारित जिवंत देखावे सादर केले.
यात्रांच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. इंदिरानगर परिसरातील शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुला-मुलींच्या लेझीम पथकाने ढोलताशाच्या गजरात लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली.
झाशीची राणी, राम, सीता, कृष्ण आदींच्या वेशभूषेत बालगोपाळ सहभागी झाले. स्वागतयात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिला वर्गाने फुगडीचा मनमुराद आनंद लुटला. भगव्या झेंडय़ांमुळे वातावरण भगवेमय झाले. यात्रेच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिकही रस्त्यावर आले.

 

Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर