नाशिकमधील बागलाण तालुक्यातील तीन गावांतील लहान मुलांसह ५५ जणांना कुल्फी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी कुल्फी विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील चिराई, महड आणि बहिराणे गावात रामप्रसाद कुमावत हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास कुल्फी विक्रीसाठी गेला होता. या तिन्ही गावांतील लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी कुल्फी खाल्ल्याने त्यांना संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांना मळमळ, जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला. जवळपास ५५ जणांना रात्री उशिरा खासगी वाहनांनी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एम. भामरे, डॉ. योगेश मोराणे आणि डॉ. मंडावत यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने तत्काळ उपचार केले. या सर्वांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, श्रीराम कोळी यांच्यासह नामपूर परिसरातील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. कुल्फी विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिराईच्या सरपंच शकुंतला पाटील यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व रुग्णांच्या विविध तपासण्या करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहितीही रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.